तळागाळातील लोकांना सरकारने गाळात घातले

संग्रहित छायाचित्र

वाईतील सभेत उदयनराजे भोसले यांचा सरकारवर हल्लाबोल

वाई – ज्या लोकशाहीच्या बळावर या देशाची तुम्ही सत्ता मिळवली, त्याच देशातील लोकशाहीचा गळा घोटून सरकारने हुकूमशाही लादली आहे. ज्या तळागाळातील लोकांबद्दल तळमळीने तुम्ही बोलत होता, त्याच तळागाळातील लोकांना जास्तीजास्त गाळात घालण्याचे काम या पाच वर्षांत झाले आहे. उद्याच्या निवडणुकीत तेच लोक एक विचाराने, एकजुटीने सरकारला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शेलक्‍या शब्दात सरकारचा समाचार घेत उदयनराजे भोसले यांनी केंद्रातील सरकारला हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाई औद्योगिक वसाहतीत झालेल्या बुथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पिसाळ, सुनील काटकर, प्रतापराव पवार, बाळासाहेब भिलारे, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला करताना उदयनराजे भोसले म्हणाले, लोकशाहीतील राजांची दिशाभूल करुन सत्तेवर आलेल्या केंद्रातील सरकारने जनतेच्या हितविरोधी निर्णय घेतले.

15 लाख रुपये बॅंकेत टाकणार होते. ते तर लांबच राहिले. पण नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन लोकांनी आयुष्यभर कष्टाने जमवलेली पुंजी त्यांनी हिस्सकावून घेतली. जीएसटीसारख्या करामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. शेतकऱ्यांच्या कधी नव्हे एवढ्या संख्येने आत्महत्या या पाच वर्षांत झाल्या. महात्मा गांधींनी पंचायत राजची संकल्पना मांडली होती. सत्तेचे विक्रेंद्रीकरण होत नाही. सत्तास्थाने सामान्य माणसांच्या हातात जात नाहीत, तोपर्यंत या देशात लोकशाही नांदणार नाही, अशी त्यांची धारणा होती. या सर्वाला तिलांजली देण्याचे काम या सरकारने केले.

ज्या लोकशाहीतील राजांनी त्यांना सर्वोच्च सभागृहात विराजमान केले. त्याच सत्तेवरील लोकप्रतिनिधींना लोकशाहीचा विसर पडला आहे. अहंकार निर्माण झाला, सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यामुळे या देशात नावापुरती लोकशाही असून त्या नावाखाली हुकूमशाही लादली आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून न पाहता लोकशाही पुन्हा अस्तित्वात आणण्याकरिता एक चळवळ म्हणून पहावे.

ईस्ट इंडीया कंपनीच्या माध्यमातून या देशाला इंग्रजांनी गुलाम करुन ठेवले. त्यांनी आपली मानसिकता बदलून टाकली. नेमकं गेल्या पाच वर्षांत लोकांची मानसिकता बदलण्याचे काम आणि पाप या सरकारने केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर होती. बिझनेस इंडीया कंपनी स्थापन्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. लोकशाहीतील राजा सूज्ञ आहे.

उद्याच्या निवडणूकीत तो सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तापरिवर्तनाची ही चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही. सरकारचे चुकीचे निर्णय बदलण्यासाठी सरकार बदलावे लागेल आणि या चळवळीच्या माध्यमातून येथील जनता हा बदल केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. मकरंद पाटील म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचून या निवणुकीचे काम करावे लागणार आहे. प्रत्येकाने आपल्या मतदार संघाची जबाबदारी सांभाळायची आहे. सतर्क राहून आपल्याला या निवडणुकीत काम करायचे आहे. मनोज पवार, उदयराज कबुले, राजेंद्र राजपुरे, बाबूदादा सपकाळ, मोहनराव जाधव, अनिलआबा जगताप, राजेंद्र तांबे, सचिन शेळके, रमेश गायकवाड, प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)