जनतेनेच मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतलाय

महात्मा फुले यांना अभिवादन

ज्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा सत्यशोधक संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार आढळराव पाटील आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिक्रापूर येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोरेगाव भीमा –अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हत्येचा बदला घेण्याची धमक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे. म्हणूनच त्यांनी दहशतवादविरोधात कारवाई करताना दोन वेळा थेट पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून 300 दहशतवाद्यांचा खातमा केला, त्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केले आहेत. त्यांनी भारताची ताकद जगाला दाखवून दिली. दुसऱ्या बाजूला गोरगरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला गॅस, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशातील जनतेने नरेन्द्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

आपल्या निवडणूक प्रचारार्थ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूर तालुक्‍यातील पिंपळे-जगताप, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, लांडेवस्ती, कासारी, निमगाव म्हाळुंगी, शिरूर शहर, सरदवाडी, कोंढापुरी, राऊतवाडी आदी गावांचा दौरा केला. त्यावेळी झालेल्या कोपरासभेत ते बोलत होते. या दौऱ्यात भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब फराटे, कैलास पाटील, सरपंच संगिताताई कांबळे, घोडगंगाचे माजी संचालक कैलास सोनावणे, बापूसाहेब शिंदे, मच्छिंद्र गदादे आदी सहभागी झाले होते. या दौऱ्यात ठिकठिकाणी ग्रामस्थांच्यावतीने खासदार आढळराव पाटील यांचे वाजतगाजत मिरवणूकीद्वारे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले की, मुळात मला तुम्हाला प्रश्‍न विचारायचा आहे की, राहुल गांधी देशाचे नेतृत्त्व करण्यासाठी पर्याय होऊ शकतात का? कॉंग्रेसचा निवडणूक जाहिरनामा तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की, सत्तेवर येण्यासाठी कॉंग्रेस देशविघातक आश्‍वासने देते आहे. काश्‍मीरातील लष्कराचे हात बांधून ठेवून अतिरेक्‍यांना मोकळे रान देण्याचे त्यांचे धोरण आहे. तुम्हाला हे मान्य होणार आहे का, असा प्रश्‍नही खासदार आढळराव पाटील यांनी उपस्थितांना विचारला.

राष्ट्रवादी कॉंग्रसवर टीकेची झोड उठवितांना ते म्हणाले की, 15 वर्षे ही मंडळी सत्तेत होती, पण त्यावेळी त्यांनी काही केलं नाही. पुणे-नाशिक रस्ता असो की रेल्वे कुठल्याच प्रकल्पासाठी एक दमडाही दिला नाही. आता आपल्या चुकांचे खापर ते माझ्यावर फोडू पाहात आहेत. 2004पासून 2014पर्यंत दहा वर्षे खासदार म्हणून काम करताना जनतेच्या प्रश्‍नांसाठी, विकासकामांसाठी मी अनेकदा मंत्रालयाचे उंबरठे झिजवले. पण सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा अशा असंख्य घोटाळ्यात मग्न असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना येथील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ नव्हता. आज मी काय केले, असा प्रश्‍न विचारण्याआधी 15 वर्षे तुम्ही काय केले त्याचा हिशेब द्या.

शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, बऱ्याचदा आपण अभिनेत्यांच्या इमेजला भुलतो, पण नंतर आपल्यावर पश्‍चातापाची वेळ येते. कारण ते चांगले अभिनेते असले तरी समाजात काम करण्याची त्यांना सवय नसते. ज्येष्ठ नेते राम नाईक यांचे उदाहरण घ्या. त्यांच्यासारख्या कार्यक्षम खासदाराऐवजी लोकांनी गोविंदा या अभिनेत्याला निवडून दिले, पण त्याने जनतेसाठी काय केले? पाच वर्षांत लोकसभेत संसदेत फारसा उपस्थितही राहिला नाही, ना त्याने कधी जनतेच्या प्रश्‍नांवर तोंड उघडले नाही.

मतदारसंघात काही कामही केले नाही. शेवटी पश्‍चाताप झालेल्या लोकांना आपली चूक सुधारण्यासाठी 5 वर्षे वाट पाहावी लागली. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही ही चूक करू नका. सिरीयलमधल्या भूमिकेवर भाळू नका अन्यथा विकासाची प्रक्रिया थांबून आपला भाग मागे पडेल. खासदार आढळराव हे सुख-दुःखात नेहमी तुमच्याबरोबर राहिलेले व्यक्‍तिमत्व आहे. त्यामुळे तळमळीने काम करणाऱ्या आढळराव यांना पुन्हा खासदार केले तरच पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, पुणे-नगर, पुणे-नाशिक रस्ता यांसारखे प्रकल्प लवकर पूर्ण होतील. कारण आढळराव दादांनी या सर्व प्रकल्पांचा अभ्यास केला आहे. प्रशासनातील खाचाखोचा ते जाणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)