विमाने ठरताहेत सोने तस्करीचा ‘मार्ग’

सराफांशी साटेलोटे : पुण्यासह नागपूरमध्येही रॅकेट सक्रिय

– संजय कडू

पुणे – दुबईवरुन भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुबईत सोन्यावर कस्टम ड्युटी नसल्याने तेथे भारतापेक्षा सोने किलोला तीन ते साडेतीन लाख स्वस्त: पडते. यामुळे एक किलो सोने जरी लपवून आणले, तरी दुबईवारीचा खर्च व कमिशन वगळता तीन लाख रुपयांचा फायदा मिळतो. यामुळे सराफांशी साटेलोटे करुन दुबईवरुन सोन्याची तस्करी करण्याचे रॅकेट देशभर पसरले आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे व नागपूर अशा “रिमोट एअरपोर्ट’मार्गे तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

दुबईतूनच सोने तस्करी का?
सोन्याची तस्करी फक्त दुबई देशातूनच होते. दुबई हा ड्युटी फ्री देश आहे. यामुळे तेथे सोन्यावर कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) लागत नाही. भारतात मात्र सोन्यावर 36.5 टक्के इतके शुल्क आहे. दुबईमधून अधिकृतपणे एक ग्रॅम जरी सोने आणले, तरी त्याला कस्टम ड्युटी लागते. एखादा नागरिक एक वर्ष दुबईमध्ये वास्तव्यावस असेल तरच त्याला लाखापर्यंतच्या किंमतीचे सोने भारतात आणता येते. सोन्याची तस्करी करणारे एक किलोपर्यंतचे सोने चोरी-छुपे आणतात. एक किलोमागाने किमान साडेतीन लाख रुपयांचा फायदा असतो. यामध्ये येण्या-जाण्याचा विमान खर्च (20 हजार), रहाण्याची सोय (5 हजार) आणी कमिशन वगळता (25 हजार) वगळता तीन लाखांचा निव्वळ फायदा होते. हे सोने सराफांना विकले जाते.

ठराविक विमानतळावर तस्करांचा वावर
सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार कधीच पुढे येत नाही. यासाठी तस्कर नेमले जातात. या तस्करांना “पोपट’ असे संबोधले जाते. हे “पोपट’ भारतातीलच असतात. त्यांचे मुख्य काम दुबईवारी करुन चोरी-छुपे सोने आणणे असे असते. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील व्यक्ती जास्त करुन यामध्ये गुंतलेल्या दिसतात. गोवा, नागपूर, पुणे अशा “रिमोट’ विमानतळांवर जास्त करुन सोन्याची तस्करी करणारे उतरतात.या विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था तसेच तपासणी यंत्रणा कमी असल्याचा फायदा त्यांना मिळतो. मुंबईसारख्या विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था व तपासणी यंत्रणा असल्याने येथून सोन्याची तस्करी करणारे सहजासहजी कस्टम ऑफिसरच्या नजरेतून सुटत नाहीत. पूर्वी तस्करी करणारे कमी तिकीट असणाऱ्या एअर लाईन्समधून प्रवास करायचे. मात्र, कस्टम विभागाच्या कारवाया वाढल्यानंतर संशय येऊ नये म्हणूत ते बिझनेस क्‍लास किंवा जादा तिकीट असलेल्या एअर लाईन्समधून प्रवास करत असल्याचेही आढळून आले आहे.

‘लिक्‍विड’ सोने शोधणे अवघड  
सोन्याची तस्करी करणारे “पोपट’ कस्टम ऑफिसरला चकवा देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. बॅगेचा हॅन्डलमध्ये सोन्याचा पत्रा लपवणे, एखाद्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूत होल पाडून सोने लपवणे, पावडरच्या डब्यात सोने लपवणे, थर्मासच्या आतल्या बाजूने सोन्याचा पत्रा लावणे असे प्रकार केले जातात. तर अनेकदा शरीरामध्ये सोने लपवून आणले जाते. मात्र, अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनमध्ये ही चोरी पकडली जाते. यामुळे आता “लिक्‍विड’ स्वरुपात सोने आणले जाते. हे सोने पाय, पोटाला “लिक्‍विड’ बॅगेतून बांधले जाते. ते स्कॅनिंगमध्ये सापडत नाही.

खबऱ्यांची कमतरता कमी 
कस्टम विभागात खबऱ्यांची कमतरता कमी आहे. यामुळे तस्करांना शोधणे अवघड असते. मात्र, देहबोली आणि पासपोर्टवरुन तस्करांना शोधावे लागते. वारंवार दुबई वारी करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. तस्करी करणारे कोणतेही कामधंदे करत नाहीत. त्यांचे मूळ काम वर्षातून चार ते पाच वेळा दुबईला जाऊन तस्करी करणे आणि त्यावर मिळणाऱ्या कमिशनवर उदरनिर्वाह करणे हे असते. सोने जप्त केल्यावर ते रिझर्व बॅंकेला जमा केले जाते. सोन्याची तस्करी हा जामीनपात्र गुन्हा आहे, एक कोटी रुपयांवर सोन्याची तस्करी केली, तर मात्र तो अजामीनपात्र गुन्हा असतो.

गॅंगस्टरशी संबंध
देशात सोन्याची तस्करी हा खुन जुना विषय आहे. मुंबईत 1970 च्या काळात हाजी मस्तानसारख्या गॅंगस्टरकडून सोन्याची तस्करी केली जात होती. इलेक्‍ट्रॉनिक वस्तुंबरोबरच सोने आणि अंमली पदार्थांची तस्करीही मोठ्या प्रमाणात होत होती. सध्या तस्करीमध्ये कोणत्याही मोठ्या गॅंगस्टरचे नाव पुढे आलेले दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)