सांगवी – काळेवाडीतील निलरत्न इन्स्टिट्यूटने तंत्रशिक्षण विभागाची परवानगी न घेता अभ्यासक्रम चालवून बेकायदेशीर पदव्या दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संस्थेच्या संचालकाविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जिल्हा सत्र न्यायालयाने संस्था चालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनधिकृत शिक्षण संस्थांचे पेव फुटले आहे. काळेवाडी येथील निलरत्न इन्स्टिट्यूटने तंत्र शिक्षण परिषद शिखर संस्थेची मान्यता न घेता तसेच विविध विषयातील शैक्षणिक पदव्या दिल्या जात असल्याच्या विरोधात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने वाकड पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभाग यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याप्रकरणी महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडून चौकशी समिती नेमण्यात आली. या संस्थेने शासनाच्या तंत्र शिक्षण परिषद, दिल्ली यांची मान्यता न घेता अनधिकृतपणे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम चालवून विविध विषयाच्या अनधिकृत शिक्षणाच्या पदव्या देत असल्याचा अहवाल या समितीने दिला. त्यानुसार वाकड पोलिसांनी संस्था चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संस्था चालक निलेश ठाकरे यांनी शिवाजीनगर न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक हरीदास यांनी न्यायालयात निलरत्न संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या अनधिकृतपणे पदव्या देवून मोठी फसवणूक केली जात असल्याबाबत बाजू मांडली. त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर सोनावणे यांनी निलेश ठाकरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याची माहिती मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दिली.