“त्या’ वाहन चालकांच्या नियुक्‍त्या संपुष्टात आणण्याचे आदेश

 32 वाहन चालकांच्या बदल्या; विभाग प्रमुखांवर कार्यवाहीची जबाबदारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमधील 32 वाहनचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहचालकांची कमतरता भासत असलेल्या विभागांना या बदल्या करताना पुरेसे वाहनचालक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे मानधन तत्वावरील वाहनचालकांची सेवा संपुष्टात आणावी, असे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी सर्व विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध व विविध क्षेत्रीय कार्यालये असून, एकूण 46 विभाग कार्यरत आहेत. या सर्व विभागांमधील अधिकारी व प्रभाग अध्यक्ष असलेल्या लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या वतीने स्वतंत्र वाहनसेवा पुरविली जाते. याशिवाय वाहनचालक संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक मागणी आरोग्य विभागाकडून होत असते.

दरम्यान, 1 जुलैपासून शहरातील कचरा उचलण्याचा ठेका एजीएनव्हायरो आणि बीव्हीजी या दोन ठेकेदार संस्थांना आठ वर्षे एवढ्या प्रदीर्घ मुदतीकरिता देण्यात आला आहे. या दोन्ही ठेकेदारांना वाहने व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या दोन्ही ठेकेदार संस्थांनी स्वत: वाहनांवर चालकांची नियुक्‍ती करुन कचरा संकलन व वहनाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडे वाहनचालक पदावर कार्यरत असलेले 22 वाहनचालक आता अतिरिक्‍त ठरले होते. या सर्व वाहनचालकांची बदली आवश्‍यक असलेल्या ठिकाणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये आता वाहनचालकांची कमतरता भासणार नाही.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या वाहनावर कार्यरत असलेल्या चाहनचालकांना अन्यठिकाणी नियुक्‍ती देण्यात आल्याने, मानधनावरील चालकांची सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांनी दिले आहेत. या सर्व चालकांना महापालिकेच्या अन्य विभागांमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आठ चालक वायसीएम रुग्णवाहिका, सहा चालक उद्यान विभाग, पाच चालक अग्निशामक दल, तीन चालक वैद्यकीय विभाग व उर्वरित चालकांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यात आली आहे. या सर्व चालकांनी तत्काळ नियुक्‍तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील कचरा उचलण्याचे काम दोन ठेकेदार संस्थांनी सुरु केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वाहनांवर अतिरिक्‍त ठरलेल्या वाहन चालकांची महापालिकेच्या अन्य विभागांमध्ये बदली करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील वाहनचालकांची संख्या 22 असून, एकून 32 वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक चालक बदलीच्या ठिकाणी रुजू देखील झाले आहेत.

– राजेश आगळे, प्रशासन अधिकारी, प्रशासन विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)