भविष्यात भरघोस नफा कमावण्याची संधी (भाग-१)

गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविण्यासाठी आर्थिक सल्लागार हा फार मह्त्तवाचा ठरतो. ज्याप्रमाणे आरोग्याच्या अडचणीत योग्य डॉक्टरची गरज असते, कायदेशीर बाबींसाठी वकीलाची गरज असते, वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षित चालकांची गरज असते त्याचप्रमाणे योग्य आर्थिक नियोजनासाठी आर्थिक सल्लागाराची निश्चितच आवश्यकता आहे.

प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीमधून भरघोस परतावा हवा असतो. परंतु हा परतावा कमावण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बाबींवर काम करणे आवश्यक असते. गुंतवणूक करताना योग्य असा गुंतवणूक पर्याय निवडणे, गुंतवणुकीसाठीचा आपल्या निर्धारित कालावधी निश्चित करणे, या काळात आर्थिक पातळीवर होणाऱ्या अनेक बदलांमुळे सुरवातीच्या काळात गुंतवणुकीमध्ये होणारी वाढ जरी कमी प्रमाणात असेल किंवा काही वेळा गुंतवणुकीमध्ये नुकसान दिसत असले तरी आपल्या गुंतवणूक उद्दीष्टांपासून दूर न जाता ठरवलेल्या कालावधीमध्ये गुंतवणूक सुरु ठेवणे गरजेचे असते.

हुशार गुंतवणूकदार व अन्य गुंतवणूकदार यांच्यातील फार मोठा फरक म्हणजे आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य अशा गुंतवणूक प्रकाराची निवड करणे व बाजारात निर्माण होणाऱ्या संधीचा योग्य लाभ घेणे, यातूनच स्मार्ट गुंतवणूकदार स्वतःच्या गुंतवणुकीवर भविष्यात भरघोस नफा कमावत असतो. ज्या गुंतवणूकदारांना ठराविकच परतावा हवा आहे व कोणतीही जास्त जोखिम स्वीकारायची नाही त्यांना भविष्यात मोठा परतावा कधीही कमावता येत नाही. बऱ्याच अंशी सामान्य गुंतवणूकदार आपली गुंतवणूक बँकेतील मुदत ठेव, सोने, जमीन अशा पारंपारिक प्रकारात करत असतात आणि स्वतःची गुंतवणूक पूर्णपणे जोखिमरहित आहे असे समजत असतात. गेल्या काही वर्षात आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आलेली आहेत, बँकेच्या मुदतठेवींमध्येही मोठे नुकसान गुंतवणूदारास झालेले आहे. तसेच सोने आणि जमीन या प्रकारातही अनेक घटनांमध्ये गुंतवणूकदारास नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. केवळ भांडवलावर जोखिम घ्यायची नाही आणि परतावा कमी मिळाला तरी चालेल या भूमिकेतून आपली खरी जोखिम कमी होत नसते.

१९६४ सालापासून अस्तित्वात आलेल्या आर्थिक गुंतवणूक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड योजना. गेल्या पाच ते सात वर्षात जनमानसात याचा प्रचार आणि प्रसार वेगाने झाला आहे. अम्फी आणि सेबी यांच्या प्रयत्नांनी जनसामान्यांपर्यंत या योजनांची माहिती विविध माध्यमांमधून जात आहे. परंतु आजही म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय, त्यातून नेमका कसा फायदा होतो, म्युच्युअल फंडातील योजनांमध्ये जोखिम असते का, म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घकाळात संपत्ती निर्माण होऊ शकते का, या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी फार मोठ्या पैशांची गरज लागते का, असे अनेक प्रश्न आजही अनेक गुंतवणूकदारांना पडत आहेत.

भविष्यात भरघोस नफा कमावण्याची संधी (भाग-२)

संपूर्ण भारतभर आर्थिक सल्लागार व इतर आर्थिक संस्था या विषयांवर सातत्याने मार्गदर्शन करत असतात. योग्य सल्लागाराच्या मदतीने सामान्य गुंतवणूकदार आपल्या भविष्यातील गरजा, उद्दीष्टे स्वतःचे आर्थिक नियोजन करू शकतात. २०१९ च्या पहिल्या तिमाहीच्या संपता संपता बाजारात आज उपलब्ध असणाऱ्या गुंतवणूक संधींचा विचार केला असता म्युच्युअल फंडातील योग्य अशा योजनांमध्ये भविष्यातील पाच ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास मोठा परतावा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here