भारताला इतिहास घडवण्याची संधी

ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्य

सिडनी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरचा कसोटी सामना आजपासून सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय सांघाने मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. जर हा अखेरचा कसोटी सामना जिंकला किंवा अनिर्णीत राखला तरी भारत ही कसोटी मालिका जिंकेल आणि प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहसिक कामगिरी नोंदवेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने बाजी मारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. तिसरा सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला आणि मालिकेत निर्णायक 2-1 अशी आघाडी मिळावली आहे. मायदेशात सतत चांगली कामगिरी कारणाऱ्या भारतीय संघाने विदेशी दौऱ्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथे कसोटी मालिका गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही धोक्‍यात आले होते. ही मालिका जिंकून भारतीय संघ कसोटी क्रमवारीत आपला दबदबा निर्माण करण्यावर भर देईल.

जगातील सर्वात बलाढ्य फलंदाजी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या भारतीय सांघासाठी सलामीवीराचा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे. मयंक अगरवालच्या पदार्पणातील चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला असला तरी त्यात सुधारणेला वाव आहे. रोहित शर्मा भारतीय सांघात नसल्याने लोकेश राहुलला पुन्हा संधी मिळाली असून तो या कसोटीमध्ये कशी कामगिरी करतो यावर त्याचे संघातील भविष्य अवलंबून आहे. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संपूर्ण मालिकेमध्ये फलंदाजीची धुरा सांभाळली असून चेतेश्वर पुजाऱ्याच्या दोन शतकांच्या जोरावर भारताने दोन कसोटी सामने जिकंले आहेत तर विराटने देखील निर्णायक वेळी खेळ उंचावला आहे.

पुजाराने या मालिकेत तीन कसोटींमध्ये 56.66 च्या सरासरीने सर्वाधीक 328 धावा बनविल्या आहेत तर त्याच्या खालोखाल विराटने 259 धावा जमविल्या आहेत. मधल्या फळीतील अन्य फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. उपकर्णधार अजिंक्‍य राहाणे देखील लौकिकास साजेशी खेळी करू शकलेला नाही. भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजवली असून प्रत्येक डावात ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या कसोटीमध्ये देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने पर्थ कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी केली होती. मात्र नंतर ते कामगिरीत सातत्य राखू न शकल्याने मेलबर्न कसोटी गमावून बसले आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध देखील मालिका गमावण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. फलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता आणि अनुभवी फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात येत असलेले अपयश यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात सिडनी मैदान हे फिरकी गोलंदाजांना पूरक असल्याने त्यांची या कसोटीतदेखील भांबेरी उडण्याची शक्‍यता आहे.

अनुभवी ऍरॉन फिंच, शॉन मार्श आणि कर्णधार टीम पेन चांगली कामगिरी करून संघाचे मनोबल वाढवण्यात कमी पडल्याचा फाटका संघाला बसला आहे. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेडने 36च्या सरासरीने सर्वाधिक 217 धावा केल्या आहेत. परंतु, तळाच्या फलंदाजांनी वेळोवेळी दिलेली झुंज त्याचा आत्मविश्वास वाढवू शकते. गोलंदाजी विभागाने चांगली कामगिरी केली असल्याने ऑस्ट्रेलियाची मदार गोलंदाजीवर आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायची असेल तर गोलंदाजांना पुन्हा कमाल करून दाखवावी लागेल.

मागील तीन कसोटी सामन्यातील कामगिरी पाहता या सामन्यातही भारतीय संघ वरचढ ठरण्याचाही जास्त शक्‍यता आहे. खेळाच्या तीनही पातळ्यांवर भारतीय संघ समतोल दिसत असून खेळाडूंमध्ये सामना जिंकण्याचा आत्मविशास दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ – मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅंड्‌सकोम्ब, ऍरॉन फिंच, ट्रेव्हिस हेड, मर्नास लॅबसचेंज, टीम पेन ( कर्णधार ), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड

भारतीय संघ – मयंक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार) अजिंक्‍य राहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, कुलदीप यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)