फुकट्या प्रवाशांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

रेल्वे प्रशासनाकडून नियमित कारवाई : महसुलात कोट्यवधींनी वाढ

पुणे – रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर नियमित कारवाई करण्यात येते. दिवसेंदिवस अशा फुकट्या प्रवाशांचा आकडा वाढत आहे. याबरोबरच रेल्वेच्या महसुलातही कोट्यवधी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये “तरूण’ प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या मार्गांवर तिकीट तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल आणि पॅसेंजर धावण्याची वारंवारता जास्त आहे. या गाड्यांना विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी प्रवाशांची गर्दी असते. कमी खर्चात आणि कमी वेळात धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या रेल्वेमध्ये फुकट्या प्रवाशांचा “वेग’ वाढताना दिसत आहे.

एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईनुसार 3 लाख 37 हजार घटनांमध्ये 16 कोटी 29 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2 लाख 87 हजार प्रकरणांमध्ये 14 कोटी 76 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये विनातिकीट प्रवास करणारे 1 लाख 52 हजार प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून 8 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वारंवार रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करून देखील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना नियमांचे पालन करण्यासह तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फुकट्यांमध्ये “तरुणाई’
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे. यामध्ये तिकीटावर नमूद केलेल्या कोचऐवजी जास्त श्रेणीच्या कोचमधून प्रवास करणे. याचबरोबर पास न बाळगणे, आरक्षणाशिवाय प्रवास करणे आणि पासची मुदत संपल्यानंतरही त्याच पासवर प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण अधिक आहे. मुख्यत: पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

विना तिकीट प्रवास केल्यास दंडाची तरतूद :
– तिकीटाच्या रकमेसह कमीत कमी 250 रुपये दंड
– तिकीटाच्या पटीत अतिरिक्त दंड
– दंड न भरल्यास कारावासाच्या शिक्षेची शक्‍यता

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)