नवी दिल्ली – दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांमधील स्पर्धेमुळे डेटा स्वस्त व अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे आगामी काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत 2023 पर्यंत 40 टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्याच बरोबरीत स्मार्टफोन बाळगणाऱ्यांची संख्याही दुप्पट होण्याचे संकेत मॅकिन्झे यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आले आहेत.
सन 2013 पासून इंटरनेट डेटाच्या किमती 95 टक्क्यांनी घटल्या आहेत. तर डिजिटल क्षेत्रात 2025 पर्यंत दोन पट वाढ होत ते 355 ते 435 अब्ज डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर भारताचा विचार करता भारतातील डिजिटल सेवा वापर करणाऱ्यांच्या संख्येत सर्वांत वेगाने वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 2018 मध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्याचा आकडा 56 कोटी होता. तो आणखी वाढणार आहे.