विज्ञानविश्‍व: नोत्र दाम वाचवणारा “कोलोसस’

डॉ. मेघश्री दळवी

गेल्या आठवड्यात पॅरिसच्या विख्यात नोत्र दामला आग लागल्याची दृश्‍यं तुम्ही पाहिली असतील. नोत्र दाम हे मध्ययुगीन कॅथीड्रल त्याच्या गॉथिक शैलीच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा गोलाकार घुमट पॅरिसच्या क्षितिजावर नेहमीच उजळून दिसणारा आणि त्याच्या उंच निमुळत्या मनोऱ्याला पॅरिसकरांच्या मनात एक खास जागा होती.

नोत्र दामच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना ही आग लागली. ती कशी लागली? अनेक युद्धं आणि नैसर्गिक आपत्तीमध्येही हे साडेआठशे वर्षांचं कॅथीड्रल कसं दिमाखाने उभं होतं, तो सुप्रसिद्ध मनोरा कोसळताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यात कसे अश्रू उभे राहिले? याच्या बातम्या हळूहळू येत आहेत. पण यातल्या एक बातमीला आगळं महत्त्व आहे. एकही माणूस न गमावता या आगीला आटोक्‍यात आणण्यात एका रोबोटचा सिंहाचा वाटा आहे आणि तो आहे “कोलोसस’.

एक टनाहून अधिक वजनाचा, एखाद्या रणगाड्यासारखा दिसणारा कोलोसस मिनिटाला अडीच हजार लिटर पाणी फवारू शकतो. त्याच्या प्रचंड आकारावरूनच त्याला कोलोसस नाव दिलं आहे. कारण ग्रीक भाषेत एखाद्या अवाढव्य पुतळ्याला कोलोसस म्हणतात. शार्क रोबोटिक्‍स या फ्रेंच कंपनीने बनवलेला हा रोबोट पूर्णपणे फायरप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. कोलोसस चांगला दणकट आहे. कोणत्याही पृष्ठभागावर तो फिरू शकतो. उंचवटे, खड्डे किंवा जिने आले तरी त्यांच्यावरून चढू-उतरू शकतो. त्यातल्या लिथियम आयर्न बॅटरी सुमारे आठ तास चालतात आणि हजार फूट इतक्‍या दुरूनही त्याचं नियंत्रण करता येतं. त्यामुळे नोत्र दामच्या आत कोलोससला पाठवून अग्निशमन अधिकारी बाहेरून निर्धोकपणे त्याचं नियंत्रण करू शकले. तो आत अडकून पडेल किंवा खराब होईल अशी अजिबात धास्ती त्यांना नव्हती.

नोत्र दामच्या छपरात शिशाचा वापर असल्याने ते शाबूत होतं. तिथे जागा न मिळाल्याने अग्निशमन वरून पाणी फवारू शकत नव्हते. बाह्य भाग दगडी असल्याने तिथूनही आत प्रवेश करणं किंवा फोडून आत जाणं कठीण होतं. आत भरपूर जागा असल्याने ऑक्‍सिजनची कमी नव्हती. त्यातून उंच छत, उंच मनोरा या सगळ्यामुळे आग अगदी वेगाने फैलावत होती. ड्रोनने आवारात पाणी फवारण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यातून जोराचा वारा. अशा वेळी मदतीला धावून आला तो कोलोसस. नोत्र दामचं आतलं लाकडी कमानींचं छत पूर्ण उद्‌ध्वस्त झालं आहे. पण कोलोसस नसता तर तिथल्या मोठ्या घंटा पडून आज नोत्र दामचं शतपटींनी नुकसान झालं असतं.

अग्निशमन दलाची पथकं शर्थीचे प्रयत्न करून आग विझवतात आणि आगीत अडकलेल्यांचे प्राण वाचवतात. हे काम करणाऱ्या माणसांच्या जिवाला मात्र त्यात आत्यंतिक धोका असतो. अशा जोखमींच्या कामांसाठी रोबोट्‌स वापरण्याला म्हणूनच महत्त्व आहे. रोबोट्‌सना गुदमरण्याची धास्ती नसते की हातपाय मोडण्याची भीती. शिवाय सेन्सर्सवापरून ते आगीत अडकलेल्या व्यक्‍तींना लवकर शोधून काढू शकतात. नोत्र दाममधल्या कोलोससच्या कामगिरीमुळे अशा फायरफायटर रोबोट्‌सची उपयुक्‍तता प्रकर्षाने दिसून आलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)