नवखे म्हणताहेत ‘आमच ठरलंय’!

चाकण दंगलीप्रकरणी चर्चेत आलेले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर तालुक्‍यात सुरू असलेली चर्चा, शिवसेनेतून नुकतीच हकालपट्टी झालेले खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश, शिवसेना भाजपच्या सुडाच्या राजकारणाची तालुक्‍यातील चर्चा आणि या संधीचा फायदा उठवण्यासाठी “आमच ठरलंय’ म्हणणारे “नवखे उमेदवार’ यामुळे तालुक्‍यातील राजकारण विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच तापू लागले आहे.

खेड तालुक्‍यात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी आमदार विरोधी विद्यमान आमदार असे राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत असले तरी यामध्ये “संधी साधूं’ची भर पडत आहे. चाकण हिंसाचारप्रकरणी दिलीप मोहिते यांच्या अटकेसाठी दबाव तंत्र सुरू आहे, तर या प्रकरणाशी संबंध नसल्याचे आमदार सुरेश गोरे सफाई देत असल्याने नाक्‍यावरच्या चर्चा रंगत आहेत. तर अनेक जण यातून संधी शोधत आहेत.

दिलीप मोहिते यांचे नाव चाकण दंगलीत घेत त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. तालुक्‍यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते गावागावांत निषेध सभा घेत आहेत. त्यातून निषेध व्यक्‍त करीत मोहितेपाटील यांचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता पालट झाली त्याचा बदला नुकत्याच झालेल्या लोकसभेत घेतला. मात्र, लगेचच राजकीय षड्‌यंत्र सुरू झाले आणि मोहिते-पाटील यांच्या चाकण हिंसाचारप्रकरणी अटकेचे नाट्य सुरू झाले.

खेड तालुक्‍यात राजकीय समीकरणे बदलत असताना शिवसेनेतून हकालपट्टी झालेले रामदास ठाकूर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपदाचा राम गावडे यांचा राजीनामा ही राष्ट्रवादी सेनेतील फुटीचे राजकारण करणारी समीकरणे बनणार आहेत. दिलीप मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत स्वतंत्र गट आहे. तर राम गावडे यांचाही शिवसेनेत स्वतंत्र गट आहे. याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी “गुडघ्याला बंशिंगे’ बांधली आहेत. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षात “बंडा’चे राजकारण होणार असलायची चर्चा आहे. शिवसेना-भाजप युतीमुळे आगामी निवडणुकीसाठी तालुक्‍यात “गोची’ झाली आहे. अतुल देशमुख यांच्या रूपाने उमेदवार तयार आहे मात्र, युतीच्या धर्मात हे शक्‍य होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत भाष्य?
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बाबा राक्षे, ऋषिकेष पवार, रामदास ठाकूर, शिवसेनेकडून राम गावडे, वंचित आघाडीकडून इजाज तांबोळी यांचे तालुक्‍यात शक्‍तीप्रदर्शन सुरू आहे. येत्या शुक्रवारी ऋषिकेष पवार यांचे आजोबा माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला शरद पवार येणार असल्याने व त्यावेळी तालुक्‍यातील उमेदवार कोण यावर भाष्य होणार असल्याने सागळ्यांच्या नजरा या कार्यक्रमावर लागल्या आहेत. एकूणच तालुक्‍यात इतर पक्षांपेक्षा राष्ट्रवादीत उमेदवारीचे “आमच ठरलंय’ म्हणणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ती निवडणुकीच्या काळात पक्षाला डोकेदुखी ठरणार आहे हे मात्र नक्‍की!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)