नवमतदारांचा ‘हाऊ इज द जोश…’

पुणे – मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन अनेक नवमतदारांनी उत्साहाने मतदान केले. शहरातील विविध मतदान केंद्रांवर नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहरात शिक्षण, व्यवसायासाठी राहणाऱ्या, मात्र मतदान नोंदणी गावी असणाऱ्या मतदारांनी उत्साहाने अनेक तासांचे प्रवास करत मतदानाचा हक्‍क बजावला. दैनिक “प्रभात’ने साधलेल्या संवादामध्ये नवमतदारांनी “मत’ व्यक्‍त केले.

“पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सूकता होती. प्रत्येक मत महत्त्वाचे असून ग्राह्य धरले जाते. त्यामुळे उत्सूकतेबरोबर थोडे दडपणही होते. मतदान केल्यानंतर चांगले कार्य केल्याची भावना आहे. देशातील जबाबदार नागरिक असल्याचा आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान वाटत आहे.’
श्रेयस अभ्यंकर


“18 वा वाढदिवस झाल्यानंतर लगेच मतदार नोंदणी केली. म्हणून उत्सूकता होतीच. मतदानाला लोकशाहीचा उत्सव असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. मतदान प्रक्रियेचा भाग होता आले, ही आनंदाची गोष्ट वाटली. यानिमित्ताने मतदान करताना देशाप्रती आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव अधिकच दृढ झाली.
– वैष्णवी सहस्त्रबुद्धे


“कॉलेजमध्ये सर्व मित्र-मैत्रिणींनी एकत्रितपणे ओळखपत्रसाठी अर्ज केला होता. नुकताच तो मिळाला, त्यामुळे यंदा मतदान करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे मतदानाबद्दल खूप उत्सूकता होती. आज मतदान केल्यानंतर कर्तव्यपूर्तीचा अभिमान वाटत आहे. माझ्या मित्र-मैत्रिणींनीदेखील त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केले. हा एक आनंदाचा क्षण वाटत आहे. त्यामुळे सेलिब्रेटही करणार आहोत.’
– जीनल गोहेल


पहिल्यांदाच मतदान करणार असल्यामुळे प्रचंड उत्सूकता होती. माझ्या मतदान केंद्रावर मतदान करणारा मी पहिला मतदार असल्याने हे मतदान माझ्या कायम लक्षात राहील. मतदान करणे हे जसे राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे ही नागरिक म्हणून महत्त्वाची जबाबदारी आहे. मतदानाच्या निमित्ताने ही जबाबदारी पार पाडल्याची जाणीव होत आहे. मतदान करताना देशाचा आणि शहराचा विकास करू शकणाऱ्या उमेदवाराला मतदान केल्याने खूप समाधानी आहे.
– रोहन खरे


“पहिल्यावहिल्या मतदानाची उत्सूकता होती. अनेक तरूण-तरूणी मतदान केंद्रावर दिसत असल्याने “तरूण पिढीतील’ जबाबदारी वाढल्याचे चित्र दिसत होते. यानिमित्ताने राष्ट्रभक्ती प्रमाण वाढते आहे, याचा आनंदही वाटला. तरुणाईबरोबरच आजी-आजोबा, बोहल्यावर चढणारे वधू-वर, परदेशातून आलेली मंडळी आणि अनेक व्यावसायिकांकडून देण्यात येणाऱ्या सवलतीचे फलक पाहून मतदान हा “राष्ट्रीय उत्सव’ असल्याची जाणीव झाली.’
– संजना जोगळेकर


“लोकसभेसाठी मतदान करण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक झाल्यासारखे वाटले. देशाला योग्य नेतृत्व मिळणे आणि देशाचा विकास होणे किती आवश्‍यक आहे, याची जाणीव झाली. आपल्याला योग्य उमेदवार निवडून यावा, असे वाटत असल्यास मतदान करणे महत्त्वाचे आहे. युवा पिढीने ही सुट्टी न मानता बाहेर पडून मतदान करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात आले.’
– मयुरी गद्रे


“मतदान करण्याची माझी पहिलीच वेळ होती. मतदान गावी असल्याने 130 किमीचा जवळपास पाच तासांचा प्रवास होता. हे केवळ “मतदान’ आहे, “परीक्षा’ नाही असे म्हणून मतदान टाळता येणे सोपे होते. मतदान करणे अनेक जण टाळतात, मात्र मतदान करणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य असल्याने मी माझा हक्‍क बजावल्याचे समाधान वाटते.’
– स्नेहल तटकरे, सध्या मुक्‍काम पुणे, मुळ सिंधुदुर्ग


“राष्ट्रीय कर्तव्य महत्त्वाचे या उद्देशाने मी मतदान केले. दुसऱ्या दिवशी (दि.24) रोजी परीक्षा असल्याने केवळ मतदानासाठी मी पुणे ते भुसावळ हा प्रवास करून मतदानासाठी गेले होते. मतदानाचा वेगळाच उत्साह असल्याने प्रवास करणे अवघड वाटले नाही. आमच्या सारख्या तरुणांनी मतदानाची सुट्टी वाया न घालवता लोकशाहीसाठी मतदान करून “कर्तव्य’ बजावणे आवश्‍यक आहे.’
– केतकी जोशी, सध्या मुक्‍काम पुणे, मुळ भुसावळ


पहिल्या मतदानाचा अधिकार बजावितानाचा हा आनंद माझ्यासाठी खूप वेगळा आहे. मतदानाला लोकशाहीचे कर्तव्य समजले जाते. माझे वडील नगरसेवक असल्याने मी लहानपणापासून मतदान, निवडणुका हे शब्द घरात ऐकत आले आहे. पण प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी माझे वय यावर्षी पूर्ण झाल्याने मी आनंदी आहे. मला हा हक्‍क बजावता यावा यासाठी आई-वडिलांनी मला केंद्रापर्यंत आणल्याने मी त्यांची मनापासून आभारी आहे. हा क्षण शब्दात मांडणे मला शक्‍य होत नाही.’
– नेहा दतात्रय बहिरट (दिव्यांग मतदार)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)