इस्लामिक कटरपंथीयांचे नवे मॉड्युल उघड

File photo

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेला इस्लामिक कट्टर पंथीयांच्या एका नव्या संघटनेची माहिती मिळाली असून त्यांच्या कारवायांच्या तपासणीसाठी एनआयएने उत्तरप्रदेश आणि नवी दिल्ली येथे 16 ठिकाणी छापे घातले आहेत आणि 10 जणांना ताब्यात घेतले आहे. कट्टरपंथीयांची ही संघटना हरकत उल हर्ब ई इस्लाम नावाने कार्यरत असल्याचे समजले आहे.

देशातील नेते हिटलिस्टवर
नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील छापेमारीत जेरबंद करण्यात आलेल्या अतिरेक्‍यांना भारतात अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणायचे होते. त्यासाठी त्यांनी बॉम्ब बनविण्याची साधनसामुग्रीही जमविली होती. त्याशिवाय देशातील अनेक नेते या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) प्रवक्ते अलोक मित्तल यांनी केला. ते म्हणाले, गर्दीची ठिकाणे आणि काही खास स्थळांवर या दहशतवाद्यांना स्फोट घडवून आणायचे होते. तसेच काही राजकारणी आणि इतर लोकही या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मित्तल यांनी काही फोटो आणि एक व्हिडिओही जारी केला. या व्हिडिओत एकजण बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया समजावून सांगताना दिसत आहे. या व्हिडिओतील आवाज सोहेलचा असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

या संघटनेची नेमकी उद्दीष्ठे काय आहेत आणि त्यांचे नेमके हस्तक कोण आहेत याचा माग घेण्यासाठी या संघटनेशी संबंधीत ठिकाणांवर छापे घालण्याचे सत्र एनआयएने हाती घेतले आहेत. यातून अधिक व्यापक माहिती मिळत असून त्यानुसार उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या परिसरात या संघटनेची पाळेमुळे पसरली असल्याचे लक्षात आले आहे. आता त्या ठिकाणचा शोध एनआयएने हाती घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एनआयए’ने ताब्यात घेतलेल्या 10 जणांचा इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. हे संशयित दहशतवादी उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीच्या परिसरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचाही संशय आहे. ताब्यात घेतलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना पश्‍चिम उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाबरोबर झालेल्या संयुक्‍त कारवाईत त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे “एटीएस’चे महानिरीक्षक असिम अर्जुन यांनी लखनौमध्ये सांगितले.

आज दिवसभर 17 ठिकाणी टाकलेल्या छापेमारीत 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील पाच जणांना यूपीतून आणि पाच जणांना नवी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 16 जणांपैकी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी 20 ते 30 वयोगटातील असून मुफ्ती सोहेल हा या ग्रुपचा प्रमुख आहे, असे “एनआयए’च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

या छाप्यांना पूर्व दिल्लीतल्या जाफराबाद भागातून सुरुवात करण्यात आली होती. याठिकाणी 7 तलवारी आणि पिस्तुलेही सापडली आहेत. या संदर्भात आणखी काही ठिकाणी तपासणी सुरू आहे. छापे घालण्यात आलेल्या दहशतवादी गटाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजले होते.त्या गटावर “एनआयए’च्यावतीने गेल्या काही काळापासून लक्ष ठेवण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आज घातलेल्या छाप्यांमध्ये गुन्हेगारी कारस्थानांशी संबंधित काही कागदपत्रे आणि 7.5 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 100 आयफोन मोबाईल, 135 सीम कार्ड, लॅपटॉप आणि मेमरी कार्डही जप्त करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)