बॅंकिंग क्षेत्रावरील विश्‍वास वाढण्याची गरज 

बॅंकांच्या जोरदार प्रयत्नांमुळे अनुत्पादक मालमत्ता होत आहे कमी 

मुंबई – बुडीत कर्जाची (एनपीए) 12 मोठी प्रकरणे याच आर्थिक वर्षात निकाली निघतील, असा विश्वास स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अर्जित बसू यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणांवर दिवाळखोरी व नादारी कायद्यांतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात (एनसीएलटी) सुनावणी सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एनपीएमुळे 21 पैकी 19 सरकारी बॅंका सध्या विक्रमी तोट्यात आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 2 लाख 80 हजार कोटी रुपये एनपीए असलेली 12 मोठी प्रकरणे एनसीएलटीकडे वर्ग केली आहेत. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने दिवाळखोरी नियमासंदर्भात विविध आदेश दिले. या आदेशांनंतर ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. परिणामी, या सर्व प्रकरणांवर मार्च 2019 अखेरपूर्वी निर्णय होऊ शकतो, असे बसू यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, दिवाळखोरी नियमांतर्गत या प्रकरणांचा निकाल लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीनस्तरीय रचना केली.

12 प्रकरणांबाबत प्रत्येक स्तरावर कामे कालमर्यादेनुसारच सुरू आहेत. यामुळे दिवाळखोरी नियमांतर्गत निश्‍चित केलेल्या 270 दिवसांच्या आत ही सर्व प्रकरणे मार्गी लागून बॅंकांना त्यांचा पैसा परत मिळू शकेल. या 12 प्रकरणांमध्ये सर्वाधिक एनपीए भूषण स्टील कंपनीचा आहे. या कंपनीने बॅंकांच्या 47 हजार कोटींच्या कर्जाची परतफेड केलेली नाही, पण एनसीएलटीअंतर्गत भूषण स्टीलची आता टाटा स्टीलने खरेदी केली आहे. याखेरीज एस्सार स्टीलचे (44 हजार कोटींचा एनपीए) प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. भूषण पॉवर, लॅन्को इन्फ्रा, जेपी इन्फ्राटेक या अन्य कंपन्यांचाही यात समावेश आहे.

एनपीए समस्येवर आता भारतातील सरकारी बॅंकांचे नियंत्रण आले आहे. दिवाळखोरी व नादारी कायद्यामुळे बॅंकांना या समस्येवर तोडगा काढण्याचा एक चांगला मार्ग मिळाला आहे. ऊर्जा क्षेत्र वगळता, उर्वरित क्षेत्रातील ही समस्या बॅंकांनी दूर केली आहे. त्याचे निकाल लवकरच दिसतील व पुढील तिमाहीपासून बॅंका नफ्यात येऊ शकतील, असे मत स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी न्यूयॉर्क येथे व्यक्त केले आहे. भारतातील बॅंकिंग क्षेतातील अडचणीमुळे इतर सर्वच क्षेत्रावर गेल्या काही महिन्यात बराचा नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)