जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

‘लिव्हिंग नो वन बिहाईंड’ यंदाच्या जलदिनाची संकल्पना

पुणे – “जलस्रोतांमधून शुद्ध पाणी घेऊन, त्याच जलस्रोतांमध्ये रसायनमिश्रित अशुद्ध पाणी सोडण्याच्या आणि गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याच्या प्रवृत्तीमुळे आज जलस्रोतांची अवस्था बिकट झाली आहे. यासाठी केवळ एका ठराविक क्षेत्राला दोषी न ठरवता सर्वच क्षेत्रे समान दोषी आहेत. त्यामुळेच जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी नियोजनबद्ध वापर, पुनर्वापर, पुर्नभरण अशा विविध उपायांची सक्षम अंमलबजावणीची गरज जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जगभरात दि.22 मार्च या जल दिनासाठी “लिव्हिंग नो वन बिहाईंड’ ही संकल्पना ठरविण्यात आली आहे. एकूणच जल संवर्धनात समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्‍यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंब जपून वापरणे अत्यावश्‍यक बनले आहे. त्यामुळेच सर्वांचा सहभाग ही संकल्पना यंदा ठरविण्यात आली आहे. शेती, औद्योगिक, ऊर्जानिर्मिती अशा विविध क्षेत्रांपासून अगदी घरगुती वापरातही पाण्याचे सुक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे.

पाणी वापराच्या सुक्ष्म नियोजनासोबतच सांडपाणी प्रक्रिया आणि पाण्याच्या पुनर्वापराबाबतही प्रयत्न होणे गरजेचे आहे. पुण्याचा विचार करता सद्यस्थितीत सुमारे 65 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता नदी आणि तलावांमध्ये सोडले जाते. यासाठी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अद्यापही हे प्रकल्प पूर्ण झालेले नाही. याव्यतिरिक्त पुनर्भरणासाठी शहरातील सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र अजूनही शहरातील बहुसंख्य सोसायट्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. याबाबत अधिक व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

क्षेत्रानुसार पाण्याची मागणी :
क्र. क्षेत्र मागणी
1 शेती 85.36%
2 घरगुती 9.26%
3 औद्योगिक 2.78%
4 ऊर्जानिर्मिती 2.60%
(स्त्रोत : नीति आयोग अहवाल)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)