पुणे – पाणी बचतीचे नुसतेच ढोंग! पालिकेचे जलतरण तलाव पुन्हा सुरू

संग्रहित छायाचित्र

ठेकेदारांच्या दबावाला प्रशासन पडले बळी

– सुनील राऊत

पुणे – महापालिकेने जलतरण तलाव चालविण्यासाठी देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून राजकीय दबाव आणत दोन महिन्यांपूर्वी बंद केलेले जलतरण तलाव पुन्हा सुरू केले आहेत. पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या नावाखाली हे तलाव बंद करत ज्या महापालिकेने थेट आदेश काढले होते, त्याच प्रशासनाने आता पळवाट शोधत हे तलाव पुन्हा सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे पाणी बचतीचे केवळ ढोंग केले जात असल्याचे समोर आले आहे.

पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अनावश्‍यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिमेंट रस्ते, वॉशिंग सेंटर तसेच जलतरण तलावांना पिण्याचे पाणी वापरू नयेत, असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काढले. महापालिकेचे शहरात सुमारे 31 जलतरण तलाव असून त्यातील 4 बंद आहेत; तर 27 सुरू आहेत. हे तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून चालविले जातात. या सर्व ठेकेदारांना मालमत्ता व्यवस्थापन विभागाने नोटीस बजावत तलाव बंद करण्याचे आदेश दिले. पण, हा आदेश अवघ्या महिनाभरातच प्रशासनाने बदलला असून ज्या तलावात वॉटर फिल्टर आहे, तसेच जे तलाव महापालिकेचे पाणी न वापरता बाहेरून पाणी आणतील, ते सुरू करण्यास मुभा देणारा नवीन आदेश पाणीपुरवठा विभागाने काढला आहे.

ठेकेदारांनी आणला राजकीय दबाव
नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, म्हणून मुख्यसभेत घसा कोरडा करणाऱ्या नेत्यांनाच हाताशी धरून जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी ठेकेदारांनी प्रशासनावर दबाव आणल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्यामुळे तलावात येणाऱ्यांची गर्दी जास्त असते, ही बाब लक्षात घेऊन “आम्ही पिण्याचे पाणी वापरणार नाही, बोअरवेलचे वापरू तसेच बाहेरून टॅंकरणे पाणी आणू’ असे सांगत तलाव सुरू करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार पाणीपुरवठा विभागास अभिप्राय देण्यास सांगण्यात आले. तर, या विभागाकडूनही राजकीय दबावापोटी ठेकेदारांच्या मागणीचीच री ओढत या अटींवर तलाव सुरू करू देण्यास मुभा दिली असून मागील आठवड्यात त्याचा आदेश काढण्यात आला आहे.

आदेशाआधीच अंमलबजावणी?
महापालिका प्रशासन राजकीय दबावाला झुकले असून त्यांच्याकडून बंदी मागे घेतली जाणार याची कल्पना असलेल्या ठेकेदारांनी पालिकेचा आदेश निघण्यापूर्वी म्हणजेच 15 ते 20 दिवसांपूर्वीच जलतरण तलाव सुरू केले असून त्याचा वापरही सुरू झाला आहे. त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, ज्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे या जलतरण तलावांची जबाबदारी आहे, त्यांपैकी किती जलतरण तलाव स्वत:चे पाणी वापरतात, किती जलतरण पालिकेचे पाणी वापरतात तर किती जलतरण तलाव टॅंकरचे पाणी वापरता याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या आदेशानंतर पुढील आठवड्यापासून या विभागाकडून या सर्व तलावांची पुन्हा पाहणी करण्यात येणार असून या तलावांसाठी नेमके कोणते पाणी वापरले जाते, याची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)