खासदार आढळराव चौकार मारणारच

मंचर येथे प्रचार सांगता सभेत अभिनेते सुबोध भावे यांचा विश्‍वास 

मंचर – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे कार्य राज्याबाहेर पोहोचले आहे. प्रत्येक निवडणुकीत ते मोठ्या फरकाने निवडून येतात. त्यांच्या प्रचारासाठी मी येथे आलो नसून विजयाची पार्टी साजरी करण्यासाठी आलो आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. विरोधकांना त्यांनी केलेला मतदारसंघाचा विकास दिसत नाही; परंतु मतदारांना विकास दिसत असल्याने ते आढळरावांना पुन्हा चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍यांनी विजयी करणार असल्याचा विश्‍वास सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते व चित्रपट सेना उपाध्यक्ष सुबोध भावे यांनी व्यक्‍त केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेत भावे बोलत होते. यावेळी आमदार उदय सावंत, कल्पना आढळराव पाटील, सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, जयसिंग एरंडे, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, संजय थोरात, देवीदास दरेकर, सरपंच दत्ता गांजाळे, सुरेश भोर, भाऊसाहेब सावंत पाटील, राम तोडकर, सचिन बांगर, कल्पेश आप्पा बाणखेले, प्रवीण थोरात पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भावे म्हणाले की, समाजाला वाहून घेतलेला व सातत्याने समाजाच्या भल्याचा विचार करणारा लोकनेता असताना तुम्हाला कोणत्या अभिनेत्याची गरज नाही. म्हणूनच आढळराव यांनाच पुन्हा एकदा खासदार करा.

खासदार आढळरावांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भावी केंद्रीयमंत्र्याला मत असणार आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेच्या सर्वांगीण विकासाला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. खासदार आढळराव म्हणाले की, गेल्या 15 वर्षांत विविध विकासकामे केल्यामुळेच परिसराचा विकास झाला आहे. परंतु विरोधकांना झालेला विकास दिसत नाही. मला विचारतात 15 वर्षे तुम्ही काय केले. माझा त्यांना प्रश्‍न आहे. तुम्ही 30 वर्षे काय केले. केवळ थापा मारुन विकास होत नसल्याचा टोला वळसे पाटील यांना लगावत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली.

बैलगाडा शर्यत बंद पाडण्याचे पाप राष्ट्रवादीचे आहे. गेली 15 वर्षे खासदार निधी प्रत्येक गावाला दिला आहे. माझ्याविरोधात दिशाभूल करणारी कितीही वक्‍तव्य केली तरी सूज्ञ जनता मला पुन्हा चौथ्यांदा खासदार करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)