आंदोलनाने सोनई-करजगाव पाणीयोजना लागणार मार्गी

सचिव लवकरच घेणार मुंबईत बैठक; जिल्हाधिकाऱ्यांच्या शिष्टाईने योजना सुरू
नगर –
नेवासे तालुक्‍यातील सोनई-करजगाव पाणीयोजनेत अनेक त्रुटी असतांनाही ही योजना हस्तातंरित करण्याचा आग्रह प्रशासनाकडून होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यावर कोणताही तोडगा न काढू शकल्याने अखेर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दालनात तब्बल दीड तास यावर चर्चा झाली.द्विवेदी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवांबरोबर थेट चर्चा करून या योजनेचा पोलखोल केला.त्यानंतर सचिवांनी लवकरच याबाबत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून योजना सुरू करण्यात आली.

सोनई-करजगाव पाणीयोजनेमध्ये त्रुटी असतांनाही ही योजना समितीच्या माथी मारण्याचा प्रयत्न आज गडाख यांनी हाणूण पाडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता खाजेकर यांना सोनई करजगावसह 18 गावांमधील लाभार्थ्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार आंदोलना दरम्यान घडला. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत चालविण्यात येत आहे. मात्र प्राधिकरणकडून ही योजना नियमित चालविण्यात येत नाही. त्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना ऐन दुष्काळात पाणी मिळत नाही.

ही योजना हस्तांतरण करून घ्यावी किंवा योजनेचे वीज बिल जिल्हा परिषदेने भरावे, अशी मागणी प्राधिकरणाने केली होती. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे तसेच योजनेच्या कामाची चौकशी सुरू असल्यामुळे योजना हस्तांतरण करण्यास व वीज बिल भरण्यास जिल्हा परिषदेने यापूर्वीच नकार दिला आहे. तर प्राधिकरणनेही ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे योजनेवरील गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. योजनेतून नियमित पाणी पुरवठा व्हावा, या मागणीसाठी सदस्य सुनील गडाख यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी गावांमधील सरपंचांनी आज विश्‍वजित माने यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

यावेळी प्राधिकरणच्या अधिकारी खाजेकर यांना माने यांनी बोलावून घेऊन प्रश्‍न सोडविण्यास सांगितले. मात्र खाजेकर यांनी योजना चालविण्यासाठी प्राधिकरणकडे निधी नसल्याचे सांगत योजना हस्तांतरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी आग्रह धरला. यावरून आंदोलक व खाजेकर यांच्यात खडांजगी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा प्रश्‍न मार्गी न लागल्याने अध्यक्ष विखेंच्या दालनात पुन्हा या प्रश्‍नांवर बैठ झाली. परंतू तेथेही तोडगा न निघाल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जीवन प्राधिकारणाच्या सचिवांबरोबर चर्चा केली. त्यांना सर्व वस्तूस्थिती सांगितली.

या योजनेत अनेक त्रुटी असून ती हस्तातंरित करणे योग्य होणार नाही. या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी पैसे लागणार आहे. ते प्राधिकरणाने द्यावेत अशी मागणी त्यांनी सचिवांकडे केली. त्यानुसार सचिवांनी या योजनेकडे लक्ष घालण्याचे आश्‍वासन देवून लवकरच मुंबईत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उद्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी खाजेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघडणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)