कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

नवारस्ता – पाटण तालुक्‍यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या टप्प्यातील कोयनानगर येथील छ. शिवाजी क्रीडांगणावर सुरु झालेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरुच राहिले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी प्रकल्पग्रस्तांनी कोयनानगर येथील महसूल भवनावर आंदोलन स्थळापासून मोर्चा काढला. गतवषीॅ झालेल्या आंदोलना दरम्यान महसूल भवनावर मोर्चा काढला होता. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मंडलाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार मागण्यांच्या अंमलबजावणी बाबतीत उपस्थित मंडलाधिकारी, तलाठी, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा झाली.

आंदोलक प्रकल्पग्रस्तांशी झालेल्या चर्चेमध्ये दुरुस्त संकलन याद्या दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी आंदोलन स्थळी देण्याचे मान्य केले. तसेच नवजा चौथा टप्पा ब चे संकलन वाचन आंदोलन स्थळीच येत्या दोन दिवसात वाचण्याचे मान्य केले. तसेच स्वतंत्र ग्रामपंचायतीबद्दल व चौदा गावातील व्यवहार बंदी विषयीची सर्व लिखित माहिती देण्याचे मान्य करुन इतर विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी श्रमिक मुक्ती दल पाटण तालुका कमेटीचे अध्यक्ष संजय लाड, व सर्व कमेटी सदस्य, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते,दरम्यान मोर्चा नंतर आंदोलन स्थळी प्रकल्पग्रस्त भगीनी जगुबाई चव्हाण यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या गेल्या 60 वर्षाची व्यथा मांडली, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सरकारने कोयना धरणासाठी आमच्या आजोबा, वाड वडिलांकडून जमीनी घेतल्या, यासाठी आपले संसार, घरे दारे, शेती सोडून मोठा त्याग केला पण साठ वर्षे झाली चौथी पिढी पर्यंत काही न्याय मिळाला नाही, आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी आम्ही घरे, दारे, गुरे, ढोरे सोडून आंदोलन केले. सण वार येथेच केले. यावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचे सांगत तीन महिन्यात पर्यायी जमीनी, शेतीला पाणी, गावठाणाला जागा, देऊ असे आश्वासन दिले. पण तीन महिन्यांचे दहा महिने झाले तरी जमीन काही मिळत नाही, सरकार आमची फसवणूक करत आहे, आमच्यावर दुसऱ्यांदा आंदोलन करायची वेळ आणली, आता आम्ही इथून हालणार नाही, असा इशारा दिला.

यावेळी आंदोलकांनी कोण म्हणत देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय, मंजूर मागण्यांची अंमलबजावणीची झालीच पाहिजे, अशा घोषणा देत आंदोलनस्थळी कासव गतीने काम करणाऱ्या प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी सचिन कदम, दत्ता देशमुख, महेश शेलार, दाजी पाटील, डी. डी. कदम, श्रीपती माने, संजय कांबळे, कमल कदम, वासंती विचारे यांचेसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)