दापोडी येथील घटना : मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने मारले
पिंपरी – घरघुती वादातून पोटच्या मुलानेच आईच्या अंगावर मिरचीची पूड टाकली. तसेच लोखंडी रॉडने पायावर मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. ही संतापजनक घटना रविवारी (दि.14) रात्री दीड वाजताच्या सुमारास दापोडी येथील सिध्दार्थनगर येथे घडली.
याप्रकरणी 55 वर्षीय जखमी आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा अतुल नवनाथ डांगे (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दिड वाजताच्या सुमारास अतुल दारुच्या नशेमध्ये घरी आला. तसेच घरघुती वादातून आईच्या व घरातील इतर सदस्यांच्या अंगावर मिरचीची पूड टाकली. तसेच त्यांना लोखंडी रॉडने पायावर मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर जाताना घराच्या दरवाज्याची मोडतोड करुन नुकसान केले.