आईने किडनी दिल्याने वाचले युवतीचे प्राण

कारण, ती एक आई होती !

पुणे – वयाच्या सतराव्या वर्षी मुलीची किडनी निकामी झाली…वडील ट्रक ड्रायव्हर…घरची परिस्थिती अडचणीची…डायलिसिस करण्यासाठीही पुरेसे पैसे नाही…अशा परिस्थितीत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायची कशी, किडनी कोण देणार, मुलगी वाचरणार का? असे एक, ना अनेक प्रश्‍न आई-वडिलांना पडू लागले. मात्र, ससून रूग्णालयातील डॉक्‍टरांनी मुलीच्या पालकांना धीर देत महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. आईने दिलेल्या किडनीमुळे मुलीला जीवनदान मिळाले आहे.

किडनीचा त्रास होऊ लागल्यामुळे जुन्नर तालुक्‍यातील एक गरीब कुटुंब रूग्णालयात उपचारासाठी गेले. त्यावेळी डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीमध्ये संधिवाताच्या त्रासामुळे मुलीची किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात आले. मागील तीन वर्षांपासून डायलिसिस सुरू होते. मुलगी वाचली पाहिजे, मात्र किडनी कोण देणार? शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा कसा उभा करणार? या प्रश्‍नांनी मुलीचे आई-वडिल चिंतेत होते. त्यावेळी डायलिसिससाठी ससून रुग्णालयात तिला घेऊन आले असता, नातेवाईकांना किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय दिला. त्यावेळी आईने किडनी देण्याची संमती दर्शविल्यावर मुलीची आणि आईची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉ. अभय सदरे, डॉ. गोविंद कासट , डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. नचिकेत पुरंदरे, डॉ. शंकर मुंढे, भूलतज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉ. हरीश टाटिया यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

ससून रुग्णालयातील ही अकरावी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून करण्यात आला. आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ससून सुसज्ज होत असून खाजगी रुग्णालयातील खर्च आवाक्‍याबाहेर असल्याने प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी नियमितपणे ससूनमध्ये होत आहेत.
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रूग्णालय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)