#ICCWorldCup2019 : सर्वात भेदक गोलंदाज भारतीय संघाकडे – लालचंद राजपूत

मुंबई – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असुन स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यातच कोणता संघ यंदा बाजी मारेल, कोणता संघ सर्वात समतोल आहे या वरुन चर्चा होत असताना भारतीय संघाचे माजी सलामीवीर लालचंद राजपूत यांनी भारताकडे सर्वात भेदक गोलंदाज असुन त्यांच्याबळावर भारतीय संघ विश्‍वचषकावर आपले नाव कोरेल असे विधान केले आहे.

यावेळी पुढे बोलताना राजपूत म्हणाले की, यंदाच्या विश्‍वचषकासाठीच्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार आणि मोहम्मद शमी सारखे तगडे गोलंदाज आहेत. संघाच्या वेगवान गोलंदाजांचे हे त्रिकूट दमदार कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. या तीन गोलंदाजांमुळे आपली गोलंदाजांची फळी इतर संघांपेक्षा अधिक बळकट आहे. त्याशिवाय आपल्याकडे उपलब्ध असलेली अष्टपैलूंची जोडीही प्रतिभावान असल्यामुळे विराट कोहलीचा संघ विश्‍वचषक उंचावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, असेही राजपूत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, 2011च्या भारतीय संघात आपली सर्वाधिक मदार आघाडीच्या तीन फलंदाजांवर होती. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी जवळपास प्रत्येक सामन्यात भारताला सुरेख सुरुवात करून दिली. त्याचप्रमाणे यंदा कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर भारताची भिस्त असून त्यांना महेंद्रसिंह धोनीसारख्या फलंदाजाचीसुद्धा साथ लाभेल.

हार्दिकही गेल्या वर्षभरात खेळाडू म्हणून अधिक प्रगल्भ झाला असल्यामुळे भारताचा संघ परिपूर्ण असून त्यांना नमवणे आव्हानात्मक राहील, असे राजपूत यांनी 2011च्या विश्वविजेत्या संघाशी सध्याच्या खेळाडूंशी तुलना करण्यास विचारले असता सांगितले.

राजपूत सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुंबई प्रीमियर ट्‌वेन्टी-20 लीग क्रिकेटमध्ये ट्रिम्फ नाइट्‌स मुंबई नॉर्थ ईस्ट या संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)