पोलिसांचे भावविश्व, संवेदना संमेलनातून समाजापर्यंत पोहोचतील – गृहराज्यमंत्री

पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचे भावविश्व व संवेदना या संमेलनातून समाजासमोर याव्यात, त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने आयोजित पोलिसांचे पहिले साहित्य संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पोलिसांच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला पोलीस मुख्यालय ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्गावर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर,पोलीस उपमहानिरिक्षक तथा संमेलनाध्यक्ष डॉ.बी.जे.शेखर, पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल, नागपूर पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर तसेच राज्यातून आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, पोलीस ऊन, पाऊस, दिवस-रात्र अशी कशाचीही पर्वा न करता 12 ते 16 तास काम करीत असतात. पोलिसांच्या मनाचा हळवा कोपरा या संमेलनाच्या माध्यमातून समोर येईल. त्यांच्या अडीअडचणी व समस्यांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांच्या कलेला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि याचा फायदा पोलीस बांधवांना नक्कीच मिळेल आणि याही संमेलनाला विविध स्तरावर प्राधान्य मिळेल. एरवी नेहमी हातात शस्त्र,काठ्या घेऊन समाजकंटक, आंदोलकांना पांगविणारे, नेत्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या खाकी वर्दीवाल्याकडून चक्क कविता, चारोळी, शौर्यगीते,साहित्यावरील चर्चा ऐकू येणार असल्याचेही गृह राज्यमंत्री म्हणाले.

पोलीस महासंचालक पडसलगीकर म्हणाले, लिखाणाची सुरुवात प्रत्येक पोलीस ठाण्यात केसेस लिहिण्यातून होते. पण पोलिसांनी केलेले लेखन या साहित्य संमलनाच्या निमित्ताने बाहेर आले आहे. हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस आपल्या सेवा सांभाळत काही ना काही लिहितो. हेच आमचे यश आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांच्यातील भावना, इच्छा जपण्यासाठी भरविलेले हे ऐतिहासिक संमेलन आहे, यापुढेही अशा प्रकारचे संमेलन सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)