महापौरांनी उघडली विकासकामांची पोटली

सीना नदीचे सुशोभीकरण, महिलांसाठी स्वच्छतागृह, आदी कामांचा मानस

नगर –
महापालिकेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करतांना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज शहरातील विकास कामांची पोटलीच उघडली असून शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटी निधीसह जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेल्या निधीतून अनेक विकास कामे पूर्ण करण्याचा मानस व्यक्‍त करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वाकळे यांनी म्हटले आहे. हे करतांना महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून इतर खर्च कमी करून विकासाला चालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वाकळे यांनी आज सभेत शहर विकासबाबत आपले मनोगत व्यक्‍त केले. त्यात सीनानदीचे सुशोभिकरण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नालेगाव ते काटवन खंडोबा पुलापर्यंत सीनानदीच्या सुशोभिकरणाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहे, शहरातील राष्ट्रसंत आंनदऋषीजी महाराज यांचे समाधीस्थळ, विशाल गणपती, अवतार मेहरबाबा, केडगाव येथील रेणूका माता मंदिर, भिंगार येथील रोकडेश्‍वर मंदिर तसेच फऱ्याबाग, भिस्तबाग महाल, अहमद शहा बादशाह यांचे समाधास्थळ परिसर बागरोजा, भूईकोट किल्ला या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास, माफक दरात एमआरआय स्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीपेठ येथील रुग्णालयात सुरू सुविधा सुरू होणार आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 3 कोटी रुपये उपलब्ध झाले आहे.

देशपांडे दवाखान्याची नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे. नेहरू मार्केट इमारत व सावेडी व्यापारी संकूल उभारण्यात येणार आहे.महिलांसाठी शहरातील गंजबाजार, गाडगीळ पटांगण, महालक्ष्मी उद्यान, सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे स्वच्छता गृह उभारण्यात येणार असून याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. प्रलंबित सावेडी उपगनरात नाट्यगृहाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. सावेडीकरांची मागणी आता पूर्ण होत असून सावेडी परिसरासाठी स्मशान भूमी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभागाला जागे शोधून भूसंपादनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

भूयारी गटारीचे काम लवकरच पूर्ण करण्याचे येत आहे. कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषक स्पर्धे घेण्यात येणार आहे. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये विकेंद्रीत कंम्पोस्ट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पिंपळगाव माळवी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 15 लाख मंजूर झाले असून त्यातून पिंपळगाव माळवी येथे डॉग होस्टेल उभारण्यात येणार आहे. बेघर व फूटपाथवर राहणाऱ्यांसाठी रात्रनिवारा इमारत बांधण्यात येणार आहे. ही कामे करण्याचा मानस महापौरांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)