प्रमुख मार्गांवर दर 5 मिनिटांनी पीएमपी बस मिळेल

गिरीश बापट : मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचार, ऍम्युनिशन फॅक्‍टरी कर्मचाऱ्यांची भेट

पुणे – “पीएमपीच्या ताफ्यात 500 ई-बसेस आणि 840 सीएनजी बसेसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्टपर्यंत ताफ्यात पुरेशा बसेस उपलब्ध होतील. त्यामुळे प्रमुख मार्गांवर पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस उपलब्ध होऊ शकेल,’ असे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले. वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या ग्रामीण भागात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी आमदार जगदीश मुळीक, संतोष खांदवे, सुनील खांदवे आदी सहभागी झाले होते.

2013 ते 2017 कॉंग्रेसच्या उदासीनतेमुळे केवळ 12 नव्या बसेसची खरेदी करण्यात आली होती. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर एका वर्षांत बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. 26 जानेवारीला 25 ई-बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. या महिन्या अखेर 125 बीआरटी, जुलैमध्ये 400 सीएनजी आणि सप्टेंबर 2019 मध्ये सीएनजी तत्त्वावरील 440 सीएनजी भाडेतत्त्वावरील सीएनजी बसेस दाखल होणार आहेत.

ऍम्युनिशन फॅक्‍टरीच्या कामगारांना भेट
बापट यांनी शनिवारी सकाळी ऍम्युनिशन फॅक्‍टरी कामगारांच्या भेटी घेतल्या. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुणे शहराचे महत्त्व वेगळे आहे. ते जपण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे आश्‍वासन बापट यांनी यावेळी दिले. सिमेवर लढणाऱ्या जवानाइतकेच मोलाचे काम हे कामगार करत असल्याची भावना बापट यांनी व्यक्‍त केली. दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, प्रशांत बधे आदी यावेळी उपस्थित होते.

रिक्षाचालकांच्या समस्या सोडविणार
प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी रिक्षा ऍप सुरू करणे, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी, रिक्षांची कर्जमीटर स्मार्ट सिटीत रिक्षाला सहभागी करून अत्याधुनिक प्रिपेड थांबे, आणि रिक्षाचा विमा हप्ता कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही गिरीश बापट यांनी दिली. पुणे शहर ऑटो चालक मालक कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याला बापट उपस्थित होते.

वाणी समाजाचा पाठिंबा
अखिल लाडशाखीय वाणी समाजाने गिरीश बापट यांना जाहीर पाठींबा दिला. बापट यांच्या समर्थनार्थ कोथरूड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक दीपक पोटे, कैलास वाणी, शाम शेंडे, डॉ. जगदीश चिंचोरे, अनिल चितोडकर, विवेक शिरोडे यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवू
स्वामीनाथन आयोगाचा अहवाल गेल्या 14 वर्षांपासून स्वीकारला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. पिकाला पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार प्रकल्पाला मूर्त रूप दिले. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. परंतु, शेतकऱ्यांची 20 हजार कोटींची कर्जे आमच्या सरकारने माफ केली. तसेच शेतकऱ्यांना पेन्शनही सुरू केली. येत्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेने आम्ही ठोस पाऊले उचलणार असून शेतकऱ्यांचे प्रश्‍न आम्हीच सोडवू, असा दावा बापट यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)