मनसेच्या आंदोलनात काचेची तोडफोड

सुरक्षा अधिकाऱ्याशी झटापट : प्रशासन अधिकाऱ्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न
शालेय साहित्य खरेदी प्रकरण : ओढाताणीत सुरक्षा अधिकारी जखमी

पिंपरी – शालेय साहित्य खरेदी प्रकरण दिवसें-दिवस उग्र होत चालले आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याच्या निषेधार्थ मनसेने केलेल्या आंदोलनात महापालिका भवनातील काचेची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करणारा सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाला आहे.

महापालिकेच्या शाळा सुरू होऊन 11 दिवसांचा कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मनसेतर्फे प्राथमिक शिक्षण विभागात आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची रिकामी खुर्ची कक्षाच्या बाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांची सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. या झटापटीत सहाय्यक सुरक्षा अधिकारी विलास वाबळे यांना कक्षाच्या आतील बाजूस असलेली काच लागली. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली.

महापालिकेच्या शाळा 17 तारखेला सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन 11 दिवसांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाशिवाय अन्य शालेय साहित्य अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. मनसेचे शिष्टमंडळ प्रशासन अधिकारी शिंदे यांना भेटण्यासाठी दुपारी साडेचारच्या सुमारास आले होते. मात्र, शिंदे जागेवर नव्हत्या. सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. तसेच, त्यांच्या समवेत चर्चा देखील केली.

चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकारी शिंदे यांची खुर्ची खेचून कक्षाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी उपस्थित सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट झाली. या झटापटीत कक्षाच्या आत असलेली काच तडकली. वाबळे यांना ही काच लागून दुखापत झाली. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याबाबत आयुक्तांनी लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आंदोलनामध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, बाळा दानवले, रुपेश पटेकर, सीमा बेलापुरकर, अनिकेत प्रभू, मयुर चिंचवडे, विकास कदम, विक्रम आडे, के.के.कांबळे, अनिता पांचाळ, सुरेश सकट, निखिल सावंत, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, अनिल भुजबळ यांनी सहभाग घेतला.

कपडे, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदीबाबत उच्च न्यायालयात ठेकेदाराने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच याबाबत कार्यवाही करता येईल. बुट-सॉक्‍स, लेखन साहित्य, रेनकोट, दफ्तर आदी साहित्य वाटपाबाबत सक्षम समितीची मान्यता घेऊन त्यानुसार करार करण्यात येईल. तसेच, संबंधित साहित्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.

– पराग मुंडे, शहराध्यक्ष, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लवकरात लवकर मिळायला हवे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. साहित्य देण्यासाठी विलंब होत असल्याबद्दल आयुक्‍तांनी खुलासा करायला हवा.

– सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)