विमान कंपन्यांचा तोटा वाढणार 

इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा नकारात्मक परिणाम 

खर्चात वाढ होऊनही तिकीटदर अत्यल्प 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई – इंधनाचे वाढलेले दर आणि रुपया घसरल्यामुळे आगामी काळात विमान कंपन्यांचा तोटा वाढण्याची शक्‍यता असल्याचे क्रिसिल या विश्‍लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. जर या विमान कंपन्यानी आपल्या तिकिटाच्या दरात किमान 12 टक्‍क्‍यांनी वाढ केली नाही तर त्यांच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यापासून तिकिटाच्या दरात वाढ करण्याची गरज असूनही या कंपन्यांनी स्पर्धा वाढली असल्यामुळे तिकिटाच्या दरात वाढ केलेली नाही. मात्र आता या कंपन्यांनी काही बाबीवर मतैक्‍याने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

या कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा खर्च 35 ते 40 टक्‍के इतका आहे. त्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर या कंपन्यांना इतर काही सेवा परदेशातून घ्याव्या लागतात. त्याचे बिल त्यांना डॉलरमध्ये चुकते करावे लागते. मात्र रुपया घसरल्यामुळे त्यांना ते महागात पडत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या एकूण खर्चात वाढ झाली आहे. तर तिकिटाचे दर वाढविले नसल्यामुळे उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही.

विमान कंपन्यांत वाढलेली स्पर्धा आणि इंधनाचे वाढलेले दर यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत. त्यात केंद्र सरकारची मोठी गुंतवणूक असलेल्या एअर इंडियाचाही समावेश आहे. दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ताळेबंदानुसर एक तर या विमान कंपन्यांना तोटा झाला आहे किंवा त्यांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. जमाखर्च बिघडल्यामुळे अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्ऱ्यांना पगारही वेळेवर दिलेले नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात एकूणच अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या एक वर्षात अनेक जागतिक कारणामुळे इंधनाचे दर एकतर्फी वाढलेले आहेत. त्याचबरोबर त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर मोबाइल कंपन्यांप्रमाणे विमान कंपन्यांही अडचणीत येतील असे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)