मनेका-मुनगंटीवारांमध्ये शाब्दिक एन्कांऊटर 

अवनीच्या हत्या प्रकरण : दोन मंत्र्यांच्या वादामुळे राजकिय वातावरण तापले

मुंबई – पांढरकवडा वनक्षेत्रपरिसरात अवणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी केंद्रिय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक एन्कांऊटर सुरु झाला आहे. अवणीच्या हत्येला मुनगंटीवार यांना जबाबदार धरत मनेका गांधी यांनी आज थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर देशात अलिकडच्या काळात कुपोषणामुळे लहान बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याची जबाबदारी स्वीकारत मनेका गांधींनीच आधी स्वत:चा राजीनामा द्यावा, नंतर माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला आहे. या दोन मंत्र्यांच्या वादामुळे ऐन दिवाळीत राजकिय वातावरण तापले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात टी-1 या प्रजातीच्या अवणी वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला होता. या वाघिणीला शुक्रवारी रात्री खासगी शार्पशूटरमार्फत ठार करण्यात आले. अवणीच्या हत्येनंतर देशभरात सोशल मिडियावर वन्यप्रेमींनी राज्य सरकार व वनकर्मचाऱ्यांना टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनीही जाहिरपणे ट्विट करीत अवणीला गोळ्या घालणे म्हणजे ती एकप्रकारे हत्याच असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कमालीच्या संतापल्या होत्या.

एवढेच नव्हे तर अवणीला मारण्यासाठी एका गॅंगस्टरला बोलावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मनेका गांधींच्या या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मनेका गांधी यांनी जाहिरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते. माहितीच्या अभावी त्यांनी असे भाष्य करणे योग्य नाही. अवणी ही वनकर्मचाऱ्यांची शत्रू नाही, तिला ठार मारण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता, असे सांगतानाच याप्रकरणाची मनेका गांधी यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करावी, असे थेट आव्हान दिले होते.

मुनगंटीवारांच्या आव्हानामुळे संतापालेल्या मनेका गांधी यांनी आज अवनीच्या हत्येला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी धक्कादायक मागणी केली. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडूनच राजीनाम्याची मागणी केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मनेका गांधीच्या वक्तव्यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मुनगंटीवार यांनीही त्यांच्यावर पलटवार केला.

मनेका गांधी यांच्या मतदारसंघातही एका वाघाला ठार मारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी विरोध का केला नाही, असा सवाल करतानाच मनेका गांधी या केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री आहेत. अलिकडच्या काळात कुपोषणामुळे लहान बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची जबाबदारी स्वीकारत मनेका गांधींनी आधी स्वत:चा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, असे मुनगंटीवार म्हणाले. पंतप्रधान हे मनेका गांधींच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील, त्याचप्रमाणे माझ्या राजीनाम्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेतील, असे म्हणत मुनगंटीवारांनी मनेका गांधींना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण 
अवनीच्या हत्येवरून अडचणीत आलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे. ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. अवनीला मारल्याचे आम्हाला सगळ्यांनाच दु:ख आहे. मात्र वाघिणीला मारण्यासाठी एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत काही चूक झाली असेल तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देत याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

—————————— ——


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)