नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड या क्रिकेट विश्वातील दोन बड्या संघांदरम्यानच्या लढती नेहमीच चुरशीच्या ठरल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर टी-शर्ट काढून भारताच्या विजयाचं केलेलं सेलिब्रेशन क्रिकेट रसिकांसाठी आजही तेवढंच मेमोरेबल आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अशा अनेक अविस्मरणीय मोमेंट्सपैकी अशीच एक आठवण आहे २००७च्या पहिल्यावहिल्या टी२० क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्याची…
२००७मध्ये पहिल्यावहिल्या टी२० क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगला होता. मैदानावर युवी आणि माही यांची जोडी चौकार-षटकारांची आतिषबाजी करीत होती. अशातच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना डिवचण्यामध्ये माहीर असलेल्या अँड्रू फ्लिंटॉफने युवराज सिंगची खोड काढून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. मैदानावर युवराज सिंग आणि अँड्रू फ्लिंटॉफ यांच्यामध्ये शाब्दिक खटके देखील उडाले मात्र पंचानी वेळीच मध्यस्थी करत वाद मिटवला. अँड्रू फ्लिंटॉफने डिवचल्यामुळे आधीच अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजचा पारा भलताच चढला होता. अशातच १९वे षटक टाकण्यासाठी इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडच्या हातात चेंडू सोपविण्यात आला. मात्र स्टुअर्ट ब्रॉडच्या ‘त्या’ ओव्हरमध्ये असं काही घडेल ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासामध्ये कायम स्वरूपी केली जाईल असा किंचीतही अंदाज कोणाच्या मनाला स्पर्श करून गेला नसेल. स्टुअर्ट ब्रॉडच्या ‘त्या’ षटकातील प्रत्येक चेंडूला ‘हवाई सफरीवर’ पाठवत स्ट्राईकवर असलेल्या युवराजने एका नवा विक्रम रचला आणि तो विक्रम म्हणजे ६ चेंडूंमध्ये ६ षटकार खेचण्याचा! फ्लिंटॉफने डिवचल्यानंतर घायाळ झालेल्या युवीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीतून एकाप्रकारे “घायल शेर की सांसे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है!” हेच सिद्ध करून दाखवले.
युवीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी त्याचे भारतीय क्रिकेमधील ध्रुव ताऱ्याचे स्थान अजरामर राहणार आहे. #Will_Miss_You_Yuvi.