जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने ग्राहक त्रस्त

पाणी बिलांचे घोळच घोळ; मीटर न पाहताच अधिक रकमेची बिले मिळाल्याची तक्रार

सातारा – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे पाणी ग्राहक त्रस्त झाले असून बिलांच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात गर्दी करू लागले आहेत. त्याशिवाय पाणीबिलाच्या ठेकेदाराच्या गोंधळामुळे अनेक ग्राहकांना सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बिले मिळाली नसून भरमसाठ बिलाचा भुर्दंड त्याना सोसावा लागणार आहे. मात्र, बिल वितरणाची व्यवस्था एक महिन्यात सुरळीत होईल, असे सांगत प्राधिकरणाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शहराच्या परिसरातील शाहूनगर, शाहूपुरी, या उपनगरांसह शहरातील सदरबझार व काही पेठांना पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या मीटरचे रिडिंग घेऊन बिले तयार करण्यासाठी कराड येथील भालकर मेसर्स या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. प्राधिकरणाने ठेकेदारांच्या मार्फत शाहूनगर व शाहूपुरी भागातील नागरिकांना बिल वितरणाचे काम काही प्रमाणात सुरू केले आहे. मात्र, मीटर लॉकच्या शेऱ्यांचा घोळ झाल्याने संतापलले नागरिक प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन वाद घालू लागले आहेत. कर्मचाऱ्यांनी मीटर न पाहताच लॉक असल्याचे दाखवित अंदाजे बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत,असी लोकांची तक्रार आहे. दोन महिन्यांत तक्रार प्राप्त मीटरची दुरुस्ती करूनही पुन्हा मीटर लॉकचा शेरा आल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आल्या आहेत.

मीटर रिडिंग घेतले जात नसल्याने बिले जास्त आल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच तक्रारींचा निपटारा करताना यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. ठेकेदाराकडून अठरा हजार खातेदारांसाठी आठ मीटर रिडर व दोन सहाय्यक अशी चोवीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप बिल वितरणात सुसूत्रता नसल्याने अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राधिकरणाच्या कार्यालयात बिलावरून शेरा उडविणे आणि बिलं कमी करून घेणे या कामांसाठी ग्राहकांची तक्रार निवारण केंद्रात प्रचंड झुंबड उडाली होती.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तब्बल अठरा हजार ग्राहक आहेत. ठेकेदार बदलल्याने नोव्हेंबर ते मार्च या दरम्यानची बिले दोन टप्प्यात अदा करण्यात येत आहेत. एक महिन्यात बिल वितरणाची व्यवस्था सुरळीत होईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता पल्लवी चौगुले यांनी दिली. ज्यांच्या मीटरवर मीटर लॉक असा शेरा आला आहे, त्या ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र नोव्हेंबर ते मे या सात महिन्याच्या बिलांचे तीन तीन महिन्यांचे दोन टप्पे केवळ ठेकेदार एजन्सी बदलल्यामुळे करावे लागल्याचे चौगुले यांनी सांगितले. घर बंद आहे अथवा मीटरची नादुरुस्ती याच कारणांमुळे मीटर बंदचा शेरा पडल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बिलाची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्रुटी दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अठरा हजार खातेदारांच्या बिल वाटपामध्ये पाच हजार बिलांचे वितरण करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना बिल भरण्याच्या तारखेनंतर बिल प्राप्त होत आहेत. त्यांच्याकडून विलंब शुल्क घेतले जाणार नाही.

– एस. डी. गायकवाड, (कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)