सातारच्या हद्दवाढीची आता विधानसभेत चर्चा

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा तारांकित प्रश्‍न मंत्रिमंडळाच्या बैठकीत

सातारा – तब्बल अठरा वर्ष कागदोपत्री प्रस्तावात अडकून पडलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीवर आता थेट विधानसभेत चर्चा होणार आहे. येत्या 18 जून रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी 137587 क्रमांकाचा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला आहे. आमदारांच्या या पाठपुराव्यामुळे शहराच्या हद्दवाढीला शासन दरबारी गती मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगर विकास विभागाचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी रश्‍मीकांत इंगोले यांनी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सातारा शहराच्या हद्दवाढीच्या सद्यस्थितीचा अहवाल 27 मे पर्यंत मागवला होता. हा अहवाल विहित नमुन्यात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. एप्रिल 2001 रोजी अधिसूचना प्रसिध्दीनंतर 15 जानेवारी 2002 रोजी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता.

मात्र प्रस्ताव बरीच वर्ष कागदोपत्रीच रेंगाळला. पुन्हा नागरिकांच्या हरकती दुरुस्तीसह 30 नोव्हेंबर 2011 रोजी प्रसिद्धी व 21 डिसेंबर रोजी 2012 रोजी त्रुटी अहवाल दुरुस्तीसह पुन्हा तो शासनाला सादर करण्यात आला. मात्र 2014 नंतर हद्दवाढीच्या प्रश्‍नाला शाहूपुरी भाग वगळण्याच्या चर्चेने पुन्हा राजकीय वळण मिळाले. मात्र ना हरकत, ग्रामविकास मंत्रालयाचा अहवाल याच्यासह पुन्हा फेर प्रस्ताव 29 नोव्हेंबर 2017 पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पोहचला आहे.

साताऱ्याच्या हद्दवाढीचे ब्रह्मास्त्र राजकीय परिणाम साधण्यासाठीच भाजपने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवल्याची चर्चा आहे. मात्र आमदार शिवेंद्रराजे यांनी हा प्रश्‍न धसास लावण्याचा पवित्रा घेतला आहे. साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्‍न तारांकित करून तो थेट विधानसभेत विचारला जाणार आहे. तसा लेखी पुरवणी प्रश्‍न आमदार शिवेंद्रराजे यांनी सादर केला आहे. 137587 क्रमांकाचा हा प्रश्‍न 18 जून रोजी विधानसभेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार हे नक्की.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)