शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत

कॉंग्रेसची लोकसभेत टीका ; वाढत्या आत्महत्यांचे प्रकार चिंताजनक

नवी दिल्ली- देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्‍त करीत कॉंग्रेसच्या सदस्यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मोदी सरकारला लोकसभेत चांगलेच धारेवर धरले. सरकार केवळ शेतकऱ्यांना मदत करण्याचा देखावा करीत असून प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहींच केले जात नसल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्यांनी केला.

कृषी खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला प्रारंभ करताना कॉंग्रेसचे उत्तमकुमार रेड्डी म्हणाले की देशात दरवर्षी सरासरी 12 हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. म्हणजेच सरासरी दिवसाला तीस शेतकरी लोक आत्महत्या करीत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्षच देत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हालाकीची स्थिती निर्माण झाल्याने त्यांना जीवनयात्राच संपवण्याचे पाउल उचलावे लागत आहेत. या सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवले असले तरी गेल्या चार वर्षातील आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल हे सांगतो की या चार वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात काहीही वाढ झालेली नाहीं. या स्थितीत सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे दुप्पट करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने कृषी मालाच्या किमान आधार भूत किंमतीही चुकीच्या पद्धतीने ठरवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकलेले नाही असेही ते म्हणाले.

कापसासारख्या पिकाचे उदहारण देताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे हे पीक घेण्यात जेवढा खर्च येतो त्याच्या 25 टक्केही रक्कम त्यांना त्याच्या विक्रीतून मिळू शकलेली नाही. शेतकऱ्याना दरवर्षी दिले जाणारी सहा हजार रूपयांची रक्कम अत्यंत तोकडी आहे त्यातून त्यांना काहीही फायदा नाही असेही ते म्हणाले. पिक विमा योजनेमुळे विमा कंपन्यांच धनवान झाल्या आहेत असा आरोप त्यांनी केला. सन 2017-18 या वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून विमा कंपन्यांनी तब्बल 3 हजार कोटी रूपयांचा नफा कमावला आहे असे ते म्हणाले. शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे जीएसटीतून मुक्त करावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)