प्रेरणा : आदिवासींसाठी दीपस्तंभ : डॉ. राणी बंग

दत्तात्रय आंबुलकर 

शहरातील उच्चभ्रू माणसेही मनाला झालेला रोग दडवितात. तिथे शरीराला झालेल्या रोगाची कारणे दैवी आहेत, अशी अंधश्रद्धा बाळगणारी करणी-कवटीवर विश्‍वास ठेवणारे गडचिरोली जिल्ह्यासारख्या आदिवासी-वनवासीबहुल भागात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करणे हे तसे महाकठीण काम. या साऱ्या आव्हानात्मक पार्श्‍वभूमीवर गडचिरोलीत सर्वप्रथम मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम सुरू करण्याची जबाबदारी पेलली आहे

डॉ. राणी बंग यांनी. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गाला असताना पुढे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. आरती आता मात्र गडचिरोलीतील वनवासींच्या दुःखी मनावर मायेसह उपचाराची फुंकर घालण्याचे मानवी काम सेवा भावनेतून करीत आहेत, हे उल्लेखनीय आहे.

“मला काय आवडते यापेक्षा माझ्या समाजाला सध्या नेमके काय हवे आहे, त्यांना कशाची गरज आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. यातूनच गडचिरोलीची माणसे, तेथील वनवासी-रहिवाशी ही माझीच माणसे आहेत,’ याच एका वेड्या ध्येयाने प्रेरित झालेल्या डॉ. राणी बंग यांची धडपड म्हणूनच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. आपल्या या साऱ्या प्रयत्नांच्या संदर्भात डॉ. बंग नम्रपणे नमूद करतात की मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझा स्वधर्म आहे व हे काम करायला मिळणे हे माझे भाग्य आहे. त्यांच्या मते, त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हे त्यांच्यासाठी एक नवे पुस्तकच असते. त्यांच्या या सेवाभावी भावना पुरेशा बोलक्‍या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मानसिक रुग्णाची होणारी परवड, त्याच्या घरच्यांची होणारी चिडचिड, अगतिकता अशा बाबी लक्षात घेता, असे विशेष रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या भावनांना तडा जाऊ न देता त्यांच्यावर उपचार करण्यावर डॉ. बंग यांचा विशेष भर असतो. आपल्या मानसोपचार क्षेत्रातील उपचार-प्रयत्नांच्या जोडीलाच “सर्च’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्थानिक वनवासींमध्ये व्यसनमुक्तीच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रयत्न पण महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने व्यसनमुक्ती आवश्‍यक आहे. दारूच्या सर्वस्वी आहारी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची दुरवस्था, त्यांचा होणारा ऱ्हास, त्यांना होणारा त्रास इ. बाबी समजून घेत या कौटुंबिक-सामाजिक आजारावर उपचार करण्याचे काम पण डॉ. राणी बंग सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून करीत आहेत. अशा कुटुंबांशी संवाद साधून, त्यांच्याशी संपर्क साधून त्या त्यांच्यासाठी धीर आणि उपचार असे दोन्ही इलाज करीत असतात. याशिवाय आपल्या मनात कुठली घालमेल चालू आहे, काय समस्या आपल्यापुढे आहेत हे संबंधितांनी इतरांना सांगावे या उद्देशाने डॉ. बंग अशा मंडळींना बोलते करतात व त्याद्वारे अशा मानसिक रुग्णांचे मन हलकं करण्यासोबतच त्यांच्या मूलभूत समस्येवर कायमस्वरूपी इलाज पण करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)