अपहरण केलेली चिमुकली आईकडे सुखरूप

एक आरोपी गजाआड : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

जेजुरी  –पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (एल.सी.बी.) पथकाने सुमारे एक महिन्यापूर्वी जेजुरी येथून अपहरण केलेली दीड वर्षाची मुलगी सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन केली आहे. तसेच अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. लग्नास 7 वर्षांचा कालावधी उलटूनही मुलबाळ होत नसल्यामुळे दीड वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची कबूली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी सागर पांडुरंग खरात (वय 27, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, जि. पुणे सध्या, रा. कोलवडी मांजरी रोड, पुणे) याला अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे 2019 रोजी फिर्यादी सुरेखा उर्फ लिला विनोद भैसारे (वय 35, रा. खोमणे आळी, जेजुरी, ता. पुरंदर) या त्यांची मुलगी जान्हवी हिला सोबत घेवून गावातील पिंटू झगडे यांच्या अंत्यविधीसाठी आल्या होत्या. यामुळे जेजुरी पॉवर हाऊस येथून आरोपीने जान्हवी हिचे अपहरण केले होते.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्‍वर धोंडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्‍वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, राजू मोमीन, प्रमोद नवले, हवालदार पुनम कांबळे यांच्या पथकाकडून गुन्ह्याची माहिती घेऊन तपासाला सुरूवात केली. सदर पथकाने जेजुरी एसटी स्टॅंड व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर संशयित आरोपी निश्‍चित केला.

त्यानुसार गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढली असता फूटेजमधील व्यक्तीचे नाव सागर पांडुरंग खरात असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांना खबऱ्यांकडून आरोपी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला हडपसर येथे अटक केली. मुलीबाबत चौकशी करता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने जान्हवी हिला कोलवडी येथे पत्नीजवळ ठेवले असल्याची सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीला सुखरू तिच्या आईच्या स्वाधीन केले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)