वाहतुकीस अडथळा ठरत असल्यामुळे निर्णय
पुणे – गेले वर्षानुवर्षे पुणे शहरात भरणारा जुना बाजार आता बंद होणार आहे.वाहतुकीस अडथळा ठरत असल्यामुळे रस्त्यावर भरणारा हा बाजार बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असून याबाबतचे आदेशही काढले आहेत.
शहरातील शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेसपर्यंतच्या रस्त्यावर दर बुधवारी आणि रविवारी हा जुना बाजार भरण्यात येतो. या बाजाराच्या निमित्ताने अनेक दुकानदार आपली दुकाने रस्त्यावर मांडतात. परिणामी एका बाजूची वाहूतक बंद करावी लागते. त्याचा परिणाम हा वाहतूक कोंडीवर होतो. याबाबतच्या तक्रारी सुद्धा अनेकवेळा नागरिकांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी वरील आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार आता जुना बाजार परिसरात “नो पार्किग झोन’ व रविवारी, बुधवारी भरणाऱ्या जुना बाजारातील दुकाने रस्त्यावर लावण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर 30 दिवस या आदेशाची अंमलबजावणी होणार असून त्यानंतर या आदेशाबाबत पुनर्विचार केला जाईल, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातच हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने कोंडी वाढत होती, त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे पोलीस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.