गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

तांबडेमळा-चिमणवाडी येथील रस्त्याच्या वादामुळे ग्रामस्थ हैराण

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील तांबडेमळा-चिमणवाडी येथील रस्ता हद्दीच्या वादामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून कशीबशी वाट काढत जावे लागत आहे. तांबडेमळा-चिमणवाडी येथील रस्त्याच्या वादामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासाठी शेतकरी आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तांबडेमळा येथील चिमणवाडी रस्त्याचे आणि साकव पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. पुणे-नाशिक हमरस्ता (गोरक्षनाथ खिंड) येथून पावसाचे पाणी उताराने सुमारे एक किलोमीटर चिमणवाडी वस्तीपर्यंत येते. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत असल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्याचा वापर शेती कामासाठी आणि दैनंदिन वापरासाठी चिमणवाडी वस्तीमधील ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी करीत आहेत. पुलाचे बांधकाम ओढ्यात करण्यात आले आहे, परंतु रस्त्याचे काम आमच्या हद्दीत आहे, असे सांगून काही शेतकऱ्यांनी रस्ता वाहतुकीस बंद केला आहे.

चिमणवाडी वस्तीमधील कुटुंबांना इतर पर्यायी रस्ता वापरासाठी नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. तसेच मध्यंतरी झालेल्या पावसामुळे विद्यार्थी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने जाऊ शकले नाहीत, अशी माहिती गणेश भोर यांनी दिली. रस्त्याच्यज्ञकडेला असलेल्या शेतातून विद्यार्थ्यांना पायी जाण्यासही काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांनीही समक्ष पाहणी करुनही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोजणी करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्‍वर माऊली भोर यांनी कामांचा पाठपुरावा करुन साकव पुलासाठी सुमारे 30 लाख रुपये मंजूर केले, परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या हद्दीच्या वादावरुन काम बंद पाडले आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी आंबेगाव तालुका तहसीलदार कार्यालय व मंचर पोलीस ठाणे यांच्याशी लेखी पत्रव्यवहार केला आहे. पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता खुला न केल्यास साकव पुलाजवळ असणाऱ्या शेतीचे नुकसान होऊ शकते. वस्तीमधील नागरिकांची अडचण लक्षात घेता सदर रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)