जनता भाजप सरकारला हद्दपार करेल

खा. शरद पवार यांचे प्रतिपादन : सरकारने केवळ विकासांचे गाजर दाखवले

फलटण –
केंद्र व राज्य सरकारने जनतेला आश्‍वासनांचे व विकासांचे गाजर दाखवण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगारी, सैन्याची सुरक्षितता आदी प्रश्‍नांसाठी व सामान्य जनतेस चांगले दिवस येण्यासाठी विरोधकांची एकजूट आणि जनतेची साथ घेवून आगामी निवडणुकीत भाजपाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

फलटण येथील सजाई कार्यालयात माढा लोकसभा अंतर्गत फलटण कोरेगांव आणि माण-खटाव विधानसभा मतदार संघातील राष्टवादी कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासाठी कार्यकर्ता संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, माजी खा. रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे, नगराध्यक्षा निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोइटे, मिलिंद नेवसे, पं. स. सदस्य विश्‍वजितराजे नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, डी. के. पवार, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशात आज सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा शत्रु राष्ट्र घेऊन वारंवार देशात हिंसाचार पसरवत आहेत. पुलवामा घटनेसंदर्भात सर्व विरोधक एकत्र होऊन सरकारला पाठिंबा देत असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान राजकीय कार्य करत आहेत. त्यांना जनतेच्या भावनेशी काही देणेघेणे नाही, असा आरोप खा. शरद पवार यांनी केला. भाजपा सरकारने देशातील रिझर्व बॅंक, न्यायपालिका सीबआय यामध्ये हस्तक्षेप केल्याने त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. काळा पैसा आणण्याच्या नावाखाली त्यांनी नुसती दिशाभूल केली आहे. नोटबंदी जीएसटी याचा काहीच फायदा जनतेला झालेला नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत. शेतकऱ्यांना त्यांनी जाहीर केलेली मदत आणि पॅकेज हे नंतर फसवे निघाल असल्याचे अनेक उदाहरणाद्वारे शरद पवारांनी स्पष्ट केले. सर्व विरोधकांनी एकत्र येत भाजपा सरकारविरोधात एकीची मूठ बांधलेली आहे.

ही एकजूट सत्ता परिवर्तन करण्यास पुरेशी आहे. माझ्या घरीच सर्वांच्या बैठका होत असून आता महाराष्ट्रातून ताकद मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक संघटित होऊन एक विचाराने सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आम्हा सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खा. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 साली त्यांना जे मताधिक्‍य भेटले त्यापेक्षा जास्त मताधिक्‍य यावेळी आम्ही देऊ अशी ग्वाही ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. माजी खा. रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, कविता म्हेत्रे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संजीवराजे यांनी केले. आ. दीपक चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)