शहरातील पाणीप्रश्‍न तीव्र झाल्याने वाद आला उफाळून

शेवगाव  – शहराचा पाणीपुरवठा त्या विभागाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पूर्णपणे कोलमडला आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समन्वय राहिला नाही. तो वाद आज अचानक उफाळून आला. सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनीच आज नगरपालिकेला टाळे ठोकून आपला रोष प्रकट केला.

नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अशोक वारे यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. ते कोणत्याही प्रश्‍नाबाबत उडवाउडवीची उत्तरे देतात. पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत. पाणीपुरवठ्या बाबत त्यांचे नियंत्रण नाही. हिंदू-मुस्लीम स्मशानभूमीमध्ये पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचा ठराव होऊन दोन महिने होत आले आहेत, तरी अद्याप कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. दुष्काळामध्ये पाण्यासंदर्भात बोलवलेल्या बैठकीला अधिकारी दांड्या मारतात. यासारखे गंभीर आरोप करत सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव नगरपालकेला आज टाळे ठोकले.

दुष्काळाचे निवारण करताना कर्मचारी व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय हवा, परंतु नगरसेवक व नगरपरिषदेचे कर्मचारी यामध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ करीत असल्याचा गंभीर आरोप यावेळी या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. नगरपरिषदेचे काही विभाग जुन्या इमारतीतून सुमारे अडीच तीन किलोमीटर अंतरावरील पैठण रस्त्यावरील क्रीडा संकुलात हलविण्यात आले आहेत. त्यात सामान्य नागरिकांना नगरपरिषदेतून सातत्याने लागणारे उतारे, दाखले देण्याचा विभागही परस्पर हालविण्यात आला. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सामान्य नागरिकांना एखाद्या किरकोळ दाखल्यासाठी रिक्षा करून तेथे जावे लागते हा विनाकारण त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे. त्यामुळे ठरावाप्रमाणे जे विभाग स्थानांतरित करायला पाहिजे होते तेवढेच येथे स्थानांतरित करावेत. बाकीच्या विभागाचे कामकाज पूर्वीप्रमाणेच जुन्या इमारतीत चालू ठेवावे अशी मागणी नगरसेवक अरुण मुंडे यांनी यावेळी केली. टाळे ठोकतांना भाजपाचे नगरसेवक अरुण मुंढे, विनोद मोहिते, कैलास तिजोरे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, दिगंबर काथवटे, गणेश कोरडे, भाऊसाहेब कोल्हे, किरण काथवटे, डॉ. सुरज लांडे आदी उपस्थित होते. यावेळी शहरांमध्ये 12 दिवसाला पाणी सुटत असल्याची तक्रार कैलास तिजोरे यांनी केली. अधिकाऱ्यांना या गोष्टीचे काहीही घेणे देणे नाही असा त्रागा तिजोरे यांनी व्यक्त केला. विनोद मोहिते यांनी अनधिकृत बांधकामाला दिलेल्या नोटीसमध्ये अधिकारी मलिदा खात असल्याचा आरोप केला.

शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या उद्‌भवावर जाऊन स्वतः पाहणी करून पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल.

अशोक वारे, पाणी पुरवठा योजना अभियंता, शेवगाव नगरपरिषद.

सत्ताधारी पदाधिकारी व विरोधी पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडून आलेल्या सूचनांचा आदर करून त्या तत्काळ सोडविल्या जातील.
राजू इंगळे, कक्ष अधिकारी, शेवगाव नगरपरिषद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)