सिरीयात इस्लामिक स्टेटवर विजय मिळवल्याची घोषणा

संयुक्‍त फौजांकडून पूर्व भागातील अखेरच्या गावावर ताबा

बाघोझ – सिरीयामध्ये सक्रिय असलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्‍त फौजांनी इस्लामिक स्टेटवर पूर्ण विजय मिळवल्याची घोषणा केली आहे. इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या बाघोझ या पूर्व सिरीयातील अखेरच्या गावावर ताबा मिळवल्यानंतर संयुक्‍त फौजांनी ही विजयाची अधिकृत घोषणा केली आहे. या बरोबरच इस्लामिक स्टेटच्या स्वयंघोषित खिलाफतचाही पाडाव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

बाघोझ हे गाव आता स्वतंत्र आहे आणि संयुक्‍त फौजांनी “दाईश’ (इसिस)चा पूर्ण पाडाव केला आहे, असे कुर्द आघाडीच्या सिरीयन डेमोक्रॅटिक फोर्सेसचे प्रवक्‍ते मुस्तफा बाली यांनी ट्विटरवर सांगितले. सिरीया आणि इराकच्या बहुतांश भागवर पसरलेल्या या खिलाफतीला नष्ट करण्यात आले आहे, असे या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. हा भाग मुक्‍त करण्यासाठी अमेरिका आणि अन्य भागीदार देशांच्या फौजांना 5 वर्षांचा कालावधी लागला. अमेरिकेच्या दोन अध्यक्षांच्या काळात झालेल्या या संघर्षामध्ये तब्बल 1 लाख बॉम्ब फेकले गेले. तर असंख्य सैनिक आणि नागरिक मारले गेले.

मात्र युद्धाच्या अखेरच्या आठवड्यात दोन्हीबाजूंकडून जोरदार धुमश्‍चक्री झाली नाही. ही घोषणा करण्यापूर्वी एक दिवस आगोदरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरीयामध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे काहीही नियंत्रण राहिले नसल्याचे म्हटले होते.

बाघोझ गावाच्या दिशेने रॉकेट, मोर्तारबरोबर लढाऊ विमानांमधून बॉम्बफेक झाल्याचे स्थानिक पत्रकारांनी म्हटले आहे. जवळच्या काही गुहांमध्ये इसिसचे दहशतवादी लपून बसले असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने अजूनही कारवाई सुरुच आहे.

इस्लामिक स्टेटने सिरीया आणि इराकमध्ये लाखो लोकांना ओलिस धरून ठेवले आहे. या गटांनी मोठ्या प्रमाणावर सामुदायिक नरसंहारही केला. त्याचे भीषण व्हिडीओही बनवले आणि इंटरनेटवर पसरवले. 2014 सालापासून इराकमधील सिंजार आणि याझिदी भागातल्या हजारो महिला, मुली आणि धार्मिक अल्पसंख्यांना लैंगिक शोषणासाठी डांबून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी शेकडो अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय. सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद आणि त्याचे थरकाप उडवणारे व्हिडीओ करून इसिसने क्रौर्याची परिसिमा गाठली.

इसिसचा सिरीया आणि इराकमध्ये जरी पाडाव झाला असला, तरी जगात अन्यत्र इसिसचे अस्तित्व आहे. युरोपातील काही देशांबरोबरच इजिप्तमधील सिंनायी पेनिनसुला, अफगाणिस्तान आणि अन्यत्र इसिसचे अस्तित्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)