ब्रिस्टॉल – ज्येष्ठ गोलंदाज वासीम अक्रम व वकार युनुस हे माझ्या प्रेरणास्थानी आहेत. पाकिस्तान संघाकडून खेळण्याची मला संधी मिळाले आहे, त्याचे श्रेय मी त्यांनाच देतो असे वहाब रियाझ याने सांगितले.
भारताविरुध्द दोन वर्षापूर्वी झालेल्या सामन्यात रियाझ याने 8.4 षटकांमध्ये 89 धावा दिल्या होत्या. त्यावेळी त्याच्यावर कडाडून टीका झाली होती. साहजिकच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्या निवडीची शक्यता कमी होती. संघासाठी निवडण्यात आलेला जुनेद खान याच्या तंदुरुस्तीच्या समस्या निर्माण झाल्यानंतर रियाझ याला विश्वचषक स्पर्धेचे तिकीट लाभले. इंग्लंडवर पाकिस्तानने सनसनाटी विजय मिळविला. त्यामध्ये रियाझ याने महत्वाचे तीन गडी बाद केले व मिळालेली संधी सार्थ ठरविली.
याबाबत रियाझ म्हणाला, भारताविरुध्दच्या निराशाजनक कामगिरीनंतर मी टीकेचा धनी झालो होतो. मी खूप निराश झालो होतो. तथापि अक्रम व युनुस यांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी भरपूर सराव केला. संघात मला स्थान मिळविण्याबाबत मी आशावादी होतो. जर अक्रम व युनुस यांचे मार्गदर्शन मिळाले नसते तर आज मी घरात बसून माझ्या सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करीत बसलो असतो.