विज्ञानविश्‍व : द इनहॅबिटेबल अर्थ

डॉ. मेघश्री दळवी

न्यूयॉर्क मॅगझीनने जुलै 2017 मध्ये हवामानातील बदलावर एक मोठा अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध केला. न्यूयॉर्क मॅगझीनचे उपसंपादक डेव्हिड वॉलेस-वेल्स यांनी लिहिलेल्या ह्या लेखात येत्या काळात आपल्याला कोणत्या भयंकर परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे याचं यथार्थ चित्रण होतं. दुष्काळ, अंग अक्षरश: भाजून निघेल इतकं प्रखर ऊन, शुष्क ओसाड जमीन, माणसं पाण्यासाठी दाही दिशा फिरताहेत, हे दृश्‍य निश्‍चितच विदारक आहे. पण आज न उद्या ते प्रत्यक्षात येईल. हे सत्य नजरेआड करता येणार नाही, हे त्या लेखात सांगितलं होतं.

याच विषयावर, अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांशी चर्चा करून, सखोल अभ्यास करून लिहिलेलं त्यांचं “द इनहॅबिटेबल अर्थ’ हे पुस्तक आता प्रसिद्ध झालं आहे. आपण कृती केली नाही, तर पृथ्वी खरोखरच राहण्यायोग्य उरणार नाही हे त्यांनी त्यात पुराव्यानिशी दाखवून दिलं आहे आणि ही सत्यस्थिती मान्य करण्यावाचून पर्याय नाही.

वातावरणातला वाढता कार्बन डायऑक्‍साइड, त्यामुळे पृथ्वीवर पडणारं ग्रीनहाऊस वायूंचं पांघरूण, आणि या पांघरुणाखाली झपाट्याने वाढत जाणारं पृथ्वीचं तापमान. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी धोक्‍यात आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं धोक्‍यात आहोत आपण. थंडीचा सामना करणं आपल्याला शक्‍य आहे, पण तापमानातली सरासरी वाढ दोन अंशाच्या वर गेली तर उष्माघाताने कोट्यवधी माणसं मृत्युमुखी पडतील. विषुववृत्ताच्या आसपास राहणे अशक्‍य होईल. काही मिनिटांच्यावर आपण ऊन सहन करू शकणार नाही. सोबत प्रदूषण इतकं वाढेल, की मोकळी हवा नावाची काही चीज उरणारच नाही. एकट्या हवेच्या प्रदूषणाने कोट्यवधी माणसांचा जीव जाईल. पाण्याचं प्रदूषण आणि पाण्याची टंचाई याने किती दगावतील याचं अदमास देखील आपल्याला अजून येत नाहीय.

हिमनग वितळून समुद्राची पातळी वाढेल, अनेक शहरं पाण्याखाली जातील. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या हिमसाठ्यात अडकून राहिलेला प्रचंड प्रमाणातला कार्बन थेट वातावरणात जाईल. दुसऱ्या प्रकारे सांगायचं तर ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम चक्रवाढीने वाढत जातील. चांगल्या दर्जाचं अन्न पिकवणे दिवसेंदिवस कठीण होईल आणि अर्थातच त्याचे परिणाम सर्वांच्या आरोग्यावर दिसून येतील. साथीचे रोग आणि इतर भयानक आजार यांना बळी जाणाऱ्या माणसांच्या संख्येचा अंदाज करणे खरोखरच आपल्या कल्पनेबाहेर आहे.

हे सगळे बदल होत असताना अर्थकारण आणि राजकारण कसं मागे राहील? पुढचं महायुद्ध हे पाण्यासाठी असेल यावर नाईलाजाने का होईना, पण एकमत होत आहे आणि जगाची आर्थिक घडी कोलमडली तर मग काय?
पण आशेला अजून जागा आहे. कार्बन सिक्वेस्टर करण्यासाठी, म्हणजे वातावरणातला कार्बन वेगळा करून शोषून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या आपणहून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं बंधन घालून घेत आहेत. आपण देखील वैयक्‍तिक पातळीवर आपला कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो. फक्‍त गरज आहे ती इच्छाशक्‍तीची! आपली इच्छाशक्‍ती आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर आपण ही पृथ्वी पुन्हा एकदा राहण्यायोग्य करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)