इंग्लंड येथे 30 मे पासुन स्पर्धेला होणार सुरूवात, बुधवारी पहाटे 5 वाजता केले प्रयाण
नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ आज पहाटे (दि. 22) 5 वाजता रवाना झाला. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असल्याने ही स्पर्धा अधिकच आव्हानात्मक बनली आहे. 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
यावेळी रवाना होण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपले मत व्यक्त करताना सांगितले होते की, विजेतेपद मिळवण्यासाठी पहिल्या चेंडूपासून झुंज द्यावी लागणार आहे. कारण यंदा ही स्पर्धा वेगळ्या पद्धतीने आयोजीत केली गेलेली आहे. त्यातच माझा कर्णधार म्हणुन हा पहिलाच विश्वचषक असल्याने माझ्यावर त्याचा दबाव असणार आहे असेही त्याने यावेळी नमूद केले होते.
त्याच बरोबर इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी रवी शास्त्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतले. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरही उपस्थित होते. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा आत्मविश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला होता.
या विश्वचषकात सुरुवातीपासूनच संघाची कसोटी लागणार आहे, कारण संघाचे पहिले चारही सामने आव्हानात्मक आहेत, स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यानंतर 9 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, तर 13 जून रोजी भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील. त्यानंतर 16 जून रोजी होणाऱ्या लढतीत भारताचा सामना पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासुनच संघाचा कस लागणार आहे.