तळेगाव दाभाडे – पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण करीत दगडाने ठेचले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. गहूंजे (ता. मावळ) हद्दीत 30 मार्च रोजी ही घटना घडली. या प्रकरणी 10 एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 30) दाखल केली.
अक्षय दीपक यादव (वय 29, रा. सोमवार पेठ, पुणे) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी किरण निर्गुण बोडके, नरेंद्र गोरखनाथ ढोले, निखिल दिलीप बोडके, ओंकार विलास बोडके व केतन महेंद्रकुमार भालेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत अक्षय यादव यांच्या पत्नी सोबत किरण बोडके यांचे अनैतिक संबंध आहेत, असा संशय मयत अक्षय यादव याला होता. याची विचारणा करण्यासाठी अक्षय गहुंजे येथे गेला होता. त्यावेळी अक्षय आणि किरण यांच्यात वाद झाले. त्यावेळी किरण बोडके यांच्या वादावादीतून भांडणे झाली.
अक्षय यादव याला किरण बोडके त्याच्या साथीदारांनी दगडाने मारहाण केली. त्यावेळी आरोपी नरेंद्र ढोले, निखिल बोडके, ओंकार बोडके व केतन यांनी अक्षय यादव याला दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
जखमी अक्षयला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांनी सखोल तपास करून अक्षय यादव याचा अकस्मात मृत्यू झाला नसून, खून झाल्याचे निष्पन्न झाले. या बाबत रविवारी (दि. 30) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.