मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

याचिकेची एकत्रीत सुनावणी सोमवारी

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. मात्र मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच या याचिकेची एकत्रीत सुनावणी 10 डिसेंबरला घेण्याचे निर्देश दिले.

राज्य सरकारने कायद्यात नव्याने दुरुस्ती करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबरोबरच कायदा दुरूस्तीला जयश्री पाटील यांच्यावतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. ही याचिका आज दुपारी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.

सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे संविधानिकदृष्ट्‌या वैध नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश स्पष्ट असतानाही राज्य सरकारने 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण जाहीर केले. हे कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. तसेच राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात 2 लाखांच्या आसपास अभियांत्रिकी आणि वैद्यकिय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाचे अर्ज दाखल होण्याची शक्‍यता आहे. तर राज्य सरकारने नुकतीच 76 हजार रिक्त जागांवर मेगाभरती घोषित केली. त्यामुळे नव्याने जाहीर केलेल्या या मराठा आरक्षणामुळे संपूर्ण प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊन सर्वजण हायकोर्टात येतील, अशी भिती व्यक्त करत स्थगिती देण्याची विनंती केली.

मात्र राज्य सरकारच्या वतीने माजी ऍडव्होकेट जनरल व्ही. ए. थोरात यांनी तातडीने स्थगिती देण्याची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. दोन वर्षापूर्वी राज्य सरकारने केलेल्या कायद्यातील त्रुटीमुळे न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्या त्रुटींची राज्य सरकारने पूर्तता करून नव्याने कायद्यात दुरूस्ती केली आहे. ही याचिका न्यायालयात प्रलंबित असून त्यावर 10 डिसेंबरला सुनावणी असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाचा मुद्दा विचारात घेता अजून सहा महिन्याचा कालावधी आहे. तर मेगाभरतीबाबत राज्य सरकारने अजून कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात तातडीने कोणतेही निर्देश देण्याची आवश्‍यकता नाही, असा दावा केला. उभय पक्षांचा युक्तीवादानंतर न्यायालयाने या याचिकेवर कोणताही निर्णय न देता ही याचिका प्रलंबित याचिकेबरोबर 10 डिसेंबरला सुनावणीला घेण्याचे निर्देश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)