निविदांसाठीच्या अटी-शर्थींमध्ये प्रशासन देणार सवलत ः 10 लाख रुपयांपर्यंतची कामे मिळणार
बेरोजगार बनले रोजगार देणारे
महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक बेरोजगार तरुण आता रोजगार देणारे बनले आहेत. पालिकेच्या या अटी शिथिल झाल्याने अनेकांना निविदा मिळू लागल्याने त्यांच्याकडून हे काम करून घेण्यासाठी अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मात्र, काही घटकांकडून त्याचा गैरफायदाही घेण्यात येत असून केवळ अभियंत्याचे नाव लावून पुन्हा जुने ठेकेदाराच काम मिळवित असल्याचे चित्र आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयामुळे गेल्या वर्षभरात नवीन ठेकेदारांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे – शिक्षण आहे, पण हाताला काम नाही, व्यवसाय सुरू करायचा आहे, तर भांडवल नाही आणि निविदा प्रक्रियेत ठेकेदार म्हणून सहभागी होऊन शासकीय काम मिळवायचे तर अनुभव आणि अनामत रक्कम ठेवण्यासाठी पैसे नाहीत…अशा सुशिक्षित बेरोजगार नोंदणीकृत अभियंता ठेकेदारांना महापालिकेकडून निविदा प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा युवकांना महापालिकेची कामे मिळत असून त्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगारही प्राप्त होत आहेत.
महापालिकेकडे सुशिक्षित बेरोजगार नोंदणीकृत अभियंता असलेल्या ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र, हे अभियंता सुशिक्षित बेरोजगार असल्याने त्यांच्याकडे 10 लाखांपर्यंतची कामे करण्यासाठी आवश्यक अनुभव, बीड कपॅसिटी, टर्न ओव्हर अशा अटींची पूर्तता करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे नोंदणी असूनही त्यांना महापालिकेची कामे मिळत नाहीत.
ही बाब लक्षात घेऊन मागील वर्षी स्थायी समितीमध्ये नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अनुभवाची अट शिथिल करण्यात यावी अशी मान्यता दिली आहे. बीड कपॅसिटी, टर्न ओव्हर अशा अटींची पूर्तता करणेही शिथिल केले आहे. तसेच समकक्ष काम केल्याची अटही शिथिल करण्यात आली असून ही सवलत त्यांना नोंदणीनंतर 5 वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात 10 लाखांच्या आतमधील अनेक कामे सुशिक्षित बेरोजगारांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने 10 लाखांच्या आतील कामे क्षेत्रीय कार्यालयस्तरावर होत असल्याने अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे.