दुःख देणारे सरकार सत्तेवरून खेचणार- आ. कपिल पाटील

आ. कपिल पाटील यांचा नगरमधील शिक्षक भारतीच्या शिक्षण परिषदेत इशारा

नगर: शिक्षण व सहकार क्षेत्रात कंत्राटीकरणपद्धत देशामध्ये गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. गुजरातचे तेच मुख्यमंत्री आज देशाचे पंतप्रधान आहेत. भाजपची सत्ता असतांनाच 2004 साली जुनी पेन्शन योजना बंद करून नवी पेन्शन योजना लागू केली. आपलेच पैसे आपल्याकडून घेऊन ते मार्केटमध्ये गुंतविले. विनानुदानित शिक्षक, अंगणवाडीताईंचे आज शोषण सुरू आहे. सर्वसामान्यांना दुःख देणारे सरकार सत्तेवर असून, आगामी निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माध्यमिक शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कॉंग्रेसचे विनायक देशमुख, प्राथमिक शिक्षक भारतीचे नवनाथ गेंड, कार्याध्यक्ष सुनील गाडगे, नीलेश पाटील, जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, आप्पासाहेब जगताप, सुदाम दिघे, आशा मगर, विभावरी रोकडे आदी उपस्थित होते. परिषदेच्या सुरुवातीला सलग तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, “भारतीय जनता पक्ष सरकारने संविधानाने दिलेले अधिकार सर्वसामान्यांकडून काढून घेतले. सर्वांना पेन्शनचा अधिकार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आज मात्र त्यांना आपण विसरत चाललो आहोत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना जुनी पेन्शनचा कायदा रद्द करून नवीन कायदा आणला. नवीन कायद्यानुसार आपले पैसे सरकारने मार्केटमध्ये गुंतविले. काम करतांना जुन्या सहकाऱ्याला एक पेन्शन तर नवीन सहकाऱ्याला दुसरी पेन्शन मिळते.’ शिक्षकांचे विविध प्रश्‍न आहेत.

अनुदान नसल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत. भाजपची प्रेरणा ही संविधान नसून, हेडगेवार व गोळवलकर आहेत. मोदींनी सत्तेवर येतांना वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्‍वासन दिले होते. मात्र नोटबंदी, जीएसटीने सव्वा कोटी जनतेचा रोजगार हिरावला गेला. शिक्षणमंत्री असतांना विखेंनी जी यंत्रणा सुरळीत लावली होती, त्या यंत्रणेला मोडीत काढण्याचे काम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. पाठ्यपुस्तक मंडळावरील जुन्या, जाणत्या व्यक्तींना काढून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना त्यात घेण्यात येत आहे. त्यातून आपली ओळख पुसण्याचं काम होत असून, इतिहास बदलू पाहणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले.

विखे म्हणाले, “शिक्षण संस्थांवर दबाव टाकून एक विशिष्ट विचारधारा रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. 2019 मध्ये पुन्हा हेच सरकार निवडून आल्यास देशात 2024 साली निवडणुकाच होणार नाहीत. इतिहासात पहिल्यांदा अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

शासनाने नुकतीच दिनदर्शिका काढली. मात्र त्यात डॉ. आंबेडकर, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे.’ मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून लागलेले नाहीत. सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वांना बसत असून, येणार काळ हा आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्री फक्त घोषणा करण्यात धन्यता मानतात. आता निवडणूक जवळ आल्याने जुनी पेन्शन योजना, अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न याबाबत सरकार घोषणा करेल. मात्र त्यांच्या भूलथापांना बळी न पडल्याचे आवाहन विखेंनी केले.

सत्तेचे स्वप्न परिषदेतच रंगले!

परिषदेत सुरुवातीला काही वक्त्‌यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील शिक्षणमंत्री होतील, असे वक्तव्य केले. विखे मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांच्याशी भांडायचं सोडणार नाही, असे कपिल पाटील म्हणाले. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या विखेंनी पुढे कॉंग्रेसचेच सरकार येणार आहे. राज्यात आतापर्यंत कुठलाही शिक्षक आमदार मंत्री झाला नाही. मात्र ते भाग्य कपिल पाटलांना मिळणार, असे म्हणत पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)