सरकारच्या दुर्लक्षामुळेच कट्टरतेची विषवल्ली वाढली

अशोक चव्हाण यांची टीका – भिडेंचे कार्यकर्तेही कटात सामील
मुंबई- पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथे कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब आणि जवळपास 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करून घातपाताच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सनातन आणि शिवप्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली आहे. सरकारने या कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे जाणिवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपारा येथे धाड टाकून 20 बॉम्ब आणि स्फोटकांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या संदर्भात खासदार चव्हाण म्हणाले, राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट्टरवादी संघटनांचा कट होता, हे उघड झाले आहे. सनातन संस्थेसोबतच मनोहर भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुध्दा या कटात सामील आहेत. हे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईने उघड झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात सनातनचा साधक वैभव राऊत याच्या सोबतच शिवप्रतिष्ठानचा सुधन्वा गोंधळेकर यालाही अटक केली आहे. शिवप्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांचा समाजविघातक कृत्यामध्ये सहभाग असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे हे भीमा-कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार व अनेक समाजविघातक कृत्ये आणि दंगलीतील आरोपी आहेत. पण सरकार जाणिवपूर्क भिडेंच्या कृत्यावर पांघरून घालून भिडेंना संरक्षण देत आहे. सरकार मनोहर भिडेला कधीपर्यंत संरक्षण देणार आहे? असा सवाल करून राजकीय फायद्याचा विचार न करता सरकारने कट्टरतेची विषवल्ली मुळासकट उखडून टाकावी, असे आव्हान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)