निर्णयाची सरकारने अंमलबजावणी करावी

अण्णा हजारेंची अपेक्षा : मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत

आताची लोकशाही म्हणजे पार्टीशाही

राळेगणसिद्धीमध्ये दलितांना मंदिरात येऊ दिले जात नव्हते. त्यांचा आड स्वतंत्र होता. मात्र, आम्ही दलितांना गावात मान, सन्मान दिला. गावकऱ्यांनी मिळून दलितांचे कर्ज फेडले, अशी माहिती हजारे यांनी दिली. लोकशाही मजबूत करायची असेल तर आपल्याला काम करावे लागणार आहे. आताची लोकशाही म्हणजे पार्टीशाही झाली आहे. निवडणूक, राजकीय पक्ष हवे आहेत. मात्र, त्यामुळे समाजाचे हित बाजूला पडता कामा नये.

सातारा – मराठा आरक्षणाच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे, असे सांगून ईव्हीएम ज्या व्यक्तीने बनवले तीच व्यक्ती त्यामध्ये छेडछाड करू शकते अथवा त्यातील तज्ज्ञ यामध्ये काही तरी घोळ करू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरहून अहमदनगरच्या दिशेने जाताना अण्णा हजारे गुरुवारी थोडा वेळ सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी पत्रकारांनी अण्णा हजारेंशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची विचारपद्धती, कृषी, सामाजिक क्षेत्रातील कार्य यावर भाष्य करत मराठा आरक्षण, ईव्हीएमबाबत मते व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो सरकारला ऐकावा लागेल, असे सांगून अण्णा हजारे म्हणाले, “”भारतीय राज्यघटना सर्वोच्च असून कायदा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारला चालढकल करून चालणार नाही.

नेमका निकाल काय दिला आहे, हे मला माहीत नाही. आताचे सरकार आरक्षण देणार असे सांगत होते. मात्र, कायदा काय आहे हे पाहणे आवश्‍यक होते. न्यायालयाची बाजू महत्त्वाची होती. ती आता समोर आली. त्यामुळे सरकारला ते करावेच लागेल. कारण न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला.” आरक्षणामुळे न्याय मिळेल अथवा दुःख दूर होईल, असे नाही. पण काही प्रमाणात तरी का होईना न्याय मिळेल.

मराठा समाजाचे प्रश्‍न असंख्य आहेत. ते सुटले पाहिजेत, असे ही हजारे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या अनुषंगाने जे काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यावर आपली काय भूमिका आहे आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात की ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात याव्यात, असे विचारले असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली नाही. ते म्हणाले, ‘मी काही ईव्हीएम तज्ज्ञ नाही.

आपण ज्या रंगाचा चष्मा घालू तसे जग दिसणार. त्यामुळे मी काही तेवढा तज्ज्ञ नाही. कोणतेही यंत्र बनवले की आणि तो बनवणारा माणूस त्यात काहीही करू शकतो.” त्यामुळे ईव्हीएम असे बनवायला हवे की त्यात कोणी ढवळाढवळ करू शकणार नाही. तशी पिनच त्यात मारावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. शाहू महाराजांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल हजारे म्हणाले, “”मला अनेक पुरस्कार मिळाले. मात्र बुधवारी कोल्हापूर येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार दिल्यानंतर खऱ्या अर्थाने धन्य झालो.

हा पुरस्कार खूप वेगळा आहे. शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरू केली. सामाजिक विषमता दूर केली. सामाजिक विषमता लोकशाहीला कशी घातक आहे हे शाहू महाराजांनी ओळखले आणि ती रोखण्याचे काम केले. समाजात वितंडवाद वाढला असताना जात-पात-धर्म याच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाचा पाया रचला. पाणी, शेती प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी राधानगरी धरण बांधले. त्यांचे काम समाजासाठी दीपस्तंभ आहे. आपण त्यांच्याइतके मोठे काम करू शकणार नाही. मात्र, त्यांच्या वाटेवर जाऊन काहीतरी उभे करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)