बळीराजाचा जीव कासावीस; दुष्काळाने पशुधन धोक्‍यात

चारा – पाण्याअभावी पशुधन काढले विक्रीला!
आकाश दडस

बिदाल – दुष्काळी परिस्थितीमुळे माण-खटाव तालुक्‍यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याचा व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. माण-खटाव तालुक्‍यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाची मदार आता शासनावर अवलंबून आहे. परंतु अद्यापही शासनाने छावण्या व चारा डेपोही सुरू केले नाहीत. त्यामुळे दावणीला अन्‌ छावणीला चारा नसल्याने बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे.

माण : शेळ्यांना कळशीतून पाणी पाजताना स्थानिक महिला

गतवर्षी तालुक्‍यात जेमतेम स्वरूपात पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागले. खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांमध्ये 75 टक्के घट झाल्याने तसेच विहिरीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी यामध्येही 90 टक्के घट झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात सरासरी 80 टक्के पेरण्या न झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी तालुक्‍यात परतीचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही, त्याचाही परिणाम दिसून येत आहे. तालुक्‍यात व परिसरात कोठेही चारा नसल्याने पंधरा ते वीस किलोमीटरहून उपलब्ध होईल तेथून व मागणीप्रमाणे खरेदी करून चाऱ्यांची गरज भागवली जात आहे.

माण : ‘ना पाणी, ना असोडा’ दुष्काळाची दाहकता किती गंभीर आहे हे या छायाचित्रातून दिसतं आहे

शेतकऱ्यांच्या हातातून पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम गेल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणारा चाऱ्यावर झाल्याचे चित्र आहे. शेजारील तालुक्‍यात मका पिकांचे प्लॉट विकत घेऊन त्याचा चारा म्हणून साठवणूक करण्याचे काम शेतकरी करत आहे. तसेच सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने उसाच्या वाड्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. दुष्काळात पशुपालन करून गाय, म्हशींच्या माध्यमातून शेतकऱ्यानी पूरक दूध व्यवसायास पसंती दिली आहे. तालुक्‍यात व परिसरात साहजिकच चाऱ्याची उपलब्धता नसल्याने आगामी काळात पाच ते सहा महिने जनावरे दावणीला सांभाळायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने किमान जनावरांच्या चारा – पाण्याची सोय करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा तालुक्‍यातील वाड्या-वस्त्यामधील ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहे. दिवसेंदिवस तालुक्‍यात टंचाईचे गावे आणि टॅंकरचे प्रस्ताव वाढू लागल्याने या पुढील काळात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चाऱ्याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे पहूर परिसरातील पशुधन धोक्‍यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई-गुरे-म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. म्हसवड, मलवडी, गोंदवले, वडूज येथील बाजारात पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीस जात आहे. पशुपालकांच्या मजबुरीचा गैरफायदा व्यापारी, दलाल घेत आहेत. अल्प पर्जन्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याला दुष्ळाळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शासनाने माण तालुका टंचाईग्रस्त म्हणून घोषित केला आहे. माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जीवांचीही होरपळ वाढली आहे. पाणी टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

 

चाऱ्याचे भाव भिडले गगनाला
यंदा पाण्याअभावी माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दूबार हंगाम घेता न आल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. तब्बल 6000 रुपयांवर चारा टेम्पोचे भाव पोहचले आहेत. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकूटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे. जिवापाड जपलेली गाई, गुरे, बैल, म्हशी चारा-पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की पशुपालकांवर आली आहे. संकटग्रस्त पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या उभारण्याची गरज अधोरेखीत होत आहे.

माण तालुक्‍यात दुष्काळ जाहीर होऊन चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. परंतु अद्यापही शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. शासकीय चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांचा विचार शासन करत नाही. तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. पूर्व भागात प्रामुख्याने चाराटंचाई व पिण्याच्या पाण्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांसमवेत आंदोलन छेडण्यात येईल. – डॉ प्रमोद गावडे अध्यक्ष, बैलभंडारा विचारमंच

दुग्ध व्यवसाय संकटात
तालुक्‍यातील सर्वच भागात शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहेत. मात्र गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने चाराटंचाई निर्माण होऊ लागल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा वाढीव किमतीने विकत घ्यावा लागत आहे. दूध व शेती व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत येत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई, चाराटंचाई आणि त्यातच वाढती महागाई यामुळे दुग्धव्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)