#wari 2019 : इंद्रायणीकाठी फुलला भक्‍तीचा मळा

एम.डी. पाखरे

आळंदी – भगव्या पताका, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर करीत दिंडी व पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदीनगरीत दाखल झाल्याने पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून निघाला आहे. इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूर्वीचा आनंद मनसोक्‍त लुटत आहेत. टाळ मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण अलंकापुरी वारकऱ्यांनी दुमदुमून सोडली आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (दि. 25 ) आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणारआहे. देवस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रस्थान सोहळा रंगल्यानंतर माउलींची पालखी आळंदीतच आजोळघरी गांधीवाड्यात मुक्‍कामी राहील. बुधवारी (दि. 26) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. आषाढी वारीसाठी आलेल्या शेकडो दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांमुळे आळंदी नगरी गजबजून गेली आहे. तसेच प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आळंदीत हजारो भाविक दाखल झाले आहेत. वारकरी, भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

प्रस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर माउलींचे मंदिर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट तसेच संपूर्ण आळंदी शहरातच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. दिंड्यातील वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रॉकेल, गॅस व पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. प्रस्थान काळात आळंदी शहर स्वच्छ राहावे, म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून वेळच्या वेळी साफ सफाईवर भर देण्यात आलेला आहे. मुख्य मंदिरात संस्थानच्या वतीने सुरक्षेच्या खबरदारी घेण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, ठिकठिकाणी शिस्त लावण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पालखी प्रस्थान कार्यक्रमाची रूपरेषा निश्‍चित झाली आहे. परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी आळंदी गजबजली आहे. ठिकठिकाणच्या धर्मशाळांमध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)